राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी खारटन येथील संतश्रेष्ठ वाल्मिकी यांची आरती केली. तसंच प्रभू रामाचीही आरती केली. त्यानंतर राम हे बहुजनांचेच आहेत. त्यांची ओळख ऋषी वाल्मिकींमुळे आहे असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. तसंच ज्यांनी हिंदू धर्म वाढवला त्या शंकराचार्यांनी नेमलेल्या चार पीठांचा काय आदर अयोध्येत ठेवला गेला हे आपण पाहिलं असा टोलाही जितेंद्र आव्हाड यांनी लगावला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?

“प्रभू श्रीरामाची आठवण काढल्यावर ऋषी वाल्मिकींना विसरताच येणार नाही. ऋषी वाल्मिकी यांच्यामुळेच रामाची ओळख आहे. त्यांची आठवण काढणं क्रमप्राप्त आहे. जिथे राम आहे तिथे वाल्मिकी आहेत. प्रभू श्रीराम हे बहुजनांचे आहेत.” असंही आव्हाड म्हणाले.

आदिवासी शबरीची बोरं खाणारे राम आहेत

“सगळ्या समाजबांधवांना प्रभू रामाने एकत्र केलं. आदिवासी शबरीची बोरं खाणारे श्रीराम, रावणाचा वध करुन बिभीषणाला सिंहासन देणारे श्रीराम, वालीचा वध करुन सुग्रीवाला सिंहासन देणारे राम अशा विविध सगळ्या समाजाला एकत्र करणारे राम हे खरं रामराज्य आहे. यासाठी आम्ही सगळ्या समाजाला एकत्र करु इच्छितो. वाल्मिकी समाजाचे लोक एकत्र आले आहेत. मी कायमच म्हणतो की प्रभू राम कुणा एकाचे नाहीत ते सगळ्यांचे नाहीत. ही भावना ठेवून पूजा केली तर रामालाही वाटेल की रामराज्य आलं.” असंही आव्हाड म्हणाले.

काळा राम मंदिराला वेगळं महत्व आहे

प्रभू श्रीराम सगळीकडे आहे. नाशिकच्या काळाराम मंदिराला वेगळं महत्त्व आहे. पंचवटीत श्रीरामाचं वास्तव्य होतं. त्यामुळे उद्धव ठाकरे तिथे दर्शनाला गेले आहेत हे योग्यच आहे. रामाचं दर्शन इथे घेतलं काय आणि तिकडे जाऊन घेतलं काय, मनात श्रीराम असेल तर कुठेही दर्शन घेतलं तर ते रामापर्यंत पोहचतंच.

प्रभू राम बहुजनांचेच आहेत

राम हे बहुजनांचेच आहेत. मी माझ्या शब्दांत बदल करणार नाही. कारण श्रीराम क्षत्रिय आहेत. ते बहुजनांमध्येच येतात. राम वाल्मिकी समाजाचे आहेत. ऋषीतुल्य वाल्मिकींनी श्रीराम घडवले. त्यामुळे श्रीराम सगळ्यांचे आहेत. क्षत्रिय असलेले श्रीराम हे क्षत्रिय नाहीत हे उघडपणे कुणीही सांगावं आम्हाला मग आम्ही नाही मानणार त्यांना बहुजन. आदि शंकराचार्यांनी हिंदू धर्म वाढवला, रुजवला, पसरवला. त्यांनीच चार पीठं निर्माण केली. लोप पावलेला हिंदू धर्म वाचवण्याचं काम शंकराचार्यांनी केलं. त्या आदी शंकराचार्यांचे उत्तराधिकारी चार पीठांचे चार शंकराचार्य आहेत.त्यांचा काय सन्मान ठेवला गेला ते आपण पाहिलं असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lord ram belongs to bahujans he is known only because of valmiki says jitendra awhad after ram aarti scj
First published on: 22-01-2024 at 17:08 IST