गोंदियामध्ये एक आगळीवेगळी घटना समोर आली आहे. येथील एका दांपत्याने नवजात बाळाचं नाव ठेवण्यासाठी चक्क निवडणूक घेतली, आणि ती ही अगदी खरीखुरी वाटावी अशीच. या निवडणुकीत दांपत्याच्या मित्रपरिवार आणि नातलगांनी मतदान केलं. विशेष म्हणजे या कार्यक्रमात येथील माजी खासदार नाना पटोले हे देखील उपस्थित होते.

मिथून बांग आणि मानसी बांग यांनी 5 एप्रिल रोजी जन्मलेल्या बाळाचं नाव ठेवण्यासाठी वेगळाच मार्ग अवलंबला. नाव ठेवण्यासाठी त्यांनी 15 जुन रोजी मतदान घेण्याचं ठरवलं. त्याचं झालं असं की, बाळाचं नाव ठेवण्यासाठी या दांपत्याकडे मित्रपरिवार आणि नातलगांनी सुचवलेली तीन नावं आली. त्यामुळे नेमकं कोणतं नाव ठेवावं हे त्यांना कळत नव्हतं. अखेर त्यांनी यासाठी मतदान घेण्याचं ठरवलं.

बाळाच्या नावासाठी यक्ष, युवान आणि यौविक अशी तीन नावं आली होती. पण कोणतं नाव ठेवावं याबाबत संभ्रम निर्माण झाला. अखेर नाव ठेवण्यासाठी आम्ही मतपत्रिकांचा वापर करण्याचं ठरवलं, अशी माहिती मिथुन बांग यांनी दिली. एकूण 192 जणांनी यासाठी मतदान केलं आणि युवान या नावाला सर्वाधित पसंती असल्याचं स्पष्ट झालं. कारण सर्वाधिक 92 मतं युवान या नावाला मिळाली आणि बाळाचं नाव युवान ठेवण्यावर शिक्कामोर्तब झालं.