बाजारपेठेतील दरावर मात्र नगण्य प्रभाव
डाळी-खाद्यतेल साठय़ावर राज्य सरकारने २०१०चेच र्निबध लागू केले असून, सोमवारी रात्रीच मुंबई-पुण्यात याची अंमलबजावणी सुरू झाल्याबद्दल व्यापारी वर्गात नाराजी आहे. या र्निबधांचा मंगळवारी डाळीच्या भावावर मात्र फारसा परिणाम झालेला नाही.
सोमवारी तुरीचा भाव क्विंटलला ११ हजार ५०० रुपयांपर्यंत होता. तो मंगळवारी थोडा वाढून १२ हजार रुपये झाला. उडीद डाळीचा भाव ११ हजार १००वरून १२ हजारावर गेला, तर मूग डाळीचा भाव ९ हजारांवरून ९ हजार २०० व हरभऱ्याचा भाव ५ हजार रुपयांवर स्थिर राहिला. राज्य सरकारने सोमवारी रात्री ९ वाजता साठेबाजीवर आळा घालण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर १० वाजून १५ मिनिटांनी पुणे बाजारपेठेत अधिकाऱ्यांचे पथक गेले व व्यापाऱ्यांच्या दुकानांना सील ठोकण्यास सुरुवात केली. मात्र, हे वृत्त कळताच व्यापारी तेथे आले व त्यांनी मंगळवारी बाजारपेठ सुरू झाल्यानंतर यासंबंधी चर्चा करू. आम्ही माल हलवणार नाही, असे स्पष्ट करून सील लावण्यास प्रतिबंध केला.
अधिकाऱ्यांचे पथक पुन्हा मंगळवारी बाजारपेठेत दाखल झाले. महापालिका व ‘अ’ वर्ग नगरपालिका क्षेत्रात ठोक विक्रेत्यांना ३ हजार ५०० क्विंटल, ‘ब’ व ‘क’ नगरपालिका क्षेत्रात २ हजार क्विंटल, किरकोळ विक्रेत्यांना मनपा व ‘अ’ वर्ग नगरपालिका क्षेत्रात २०० क्विंटल तर ‘ब’ व ‘क’ नगरपालिका क्षेत्रात १०० क्विंटल इतकाच साठा ठेवता येईल, असे सांगण्यात आले. या आदेशाबद्दल व्यापाऱ्यांनी कोणतीच तक्रार केली नाही. मात्र, संध्याकाळी आदेश लागू केल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यास व्यापाऱ्यांना किमान आठ दिवसांचा अवधी द्यावा, अशी मागणी केली. मुळात बाजारपेठेत माल नाही, त्यामुळे फारशी साठवणूक नाही.
राज्य सरकारने आयात मालावर अजून कोणतेही र्निबध लागू केलेले नाहीत. खरी गरज आयातदारांवर र्निबध लावण्याची आहे. किमान साठवलेला माल विक्री करण्यासाठीची मुदत घालून दिली पाहिजे. ‘साप सोडून भुई धोपटण्याचा प्रकार’ केला जाऊ नये व किरकोळ व्यापाऱ्यांवर आततायीपणे व आकसाने कारवाई होऊ नये, अशी व्यापाऱ्यांची मागणी आहे. डाळींच्या साठय़ाबरोबर खाद्यतेलाच्या साठय़ावरही र्निबध घालण्यात आले आहेत. सध्या सोयाबीनची काढणी सुरू आहे. साठय़ावर र्निबध आले तर शेतकऱ्याला योग्य भाव मिळणार नाही. भाव पडतील. जेव्हा र्निबध लावायला हवे होते, तेव्हा मात्र सवलत दिली व जेव्हा र्निबध उठवले पाहिजेत त्या वेळी मात्र र्निबध लावण्याचा तुघलकी निर्णय घेण्यात आला आहे, असा व्यापाऱ्यांचा आरोप आहे.
गेल्या एप्रिलपासून साठेबाजीवरील र्निबध पूर्णपणे उठवण्यात आले. बाजारपेठेत माल नाही व पुढील हंगामात योग्य पाऊस पडणार नाही याचे संकेत असतानाही हे र्निबध उठवण्यात आले व याचा लाभ बाजारपेठेतील सट्टेबाजांनी उठवला. सध्या डाळींच्या साठय़ावर सरकारने र्निबध लावले ते योग्यच झाले. मात्र, दोन महिन्यांनंतर बाजारपेठेत येणारी तुरी व हरभऱ्याची आवक लक्षात घेऊन शेतकऱ्याला योग्य भाव मिळावा, यासाठी साठय़ावरील र्निबध उठवले पाहिजेत व त्यानंतर पुन्हा जूनमध्ये र्निबध लागू केले पाहिजेत. र्निबध लागू केल्यामुळे ‘घरच्या म्हातारीचे काळ’ अशी स्थिती होऊ नये याची काळजी सरकारने घेतली पाहिजे. दर दोन महिन्यांनी बाजारपेठेचा अंदाज घेऊन सरकारने आपले नियंत्रण ठेवले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.