माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि युवासेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी विद्यमान मुख्यमंत्री तसेच शिवसेनेतील बंडखोर गटाचे नेतृत्व करणारे एकनाथ शिंदे एवढं मोठं काही करतील असं वाटलं नव्हतं अशी कबुली दिली आहे. शिवसेनेमध्ये जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरु झालेल्या बंडखोरीनंतर ४० आमदारांनी ठाकरेंची साथ सोडत शिंदेंना पाठिंबा दिला. त्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या समर्थनाने राज्यामध्ये सत्ता स्थापन केली. या सत्तांतरणासंदर्भात आदित्य ठाकरेंनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दिलखुलासपणे भाष्य केलं आहे.

नक्की वाचा >> ‘मी, फडणवीस, पवार एकत्र असल्यानं काही जणांची…”; पवार अन् फडणवीसांच्या मध्ये उभं राहून भाषण देताना CM शिंदेंचा ठाकरेंना टोला

यापूर्वीही शिवसेनेमध्ये बंड झालं आहे. यावेळी मोठं बंड झालं ४० जण बाहेर पडले. उद्धव ठाकरे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री असताना हे घडलं. तर एवढी सगळी यंत्रणा असताना काहीतरी चुकलं किंवा गोष्टींचा अंदाज आला नाही, असं काही झाल्यासारखं वाटतं का? असा प्रश्न आदित्य यांना ‘मटा कॅफे’च्या मुलाखतीमध्ये विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना आदित्य यांनी शिंदे काहीतरी करण्याच्या मार्गावर आहेत याची आम्हाला कल्पना आली होती असं म्हटलं. “गेले एक ते दीड वर्ष कानावर येत होतं की हे गद्दारांचे नेते (एकनाथ शिंदे) हे काहीतरी करण्याच्या मार्गावर आहेत. एवढं मोठं काहीतरी करतील असं आम्हाला वाटलं नव्हतं. आम्हाला वाटलं होतं की राज्यसभा निवडणुकीमध्ये झालं तसं मतवगैरे फुटण्याचा प्रकार होईल,” असं आदित्य म्हणाले.

नक्की वाचा >> “माझे सासरे शिंदे होते, जावयाच्या ज्या काही…”; CM शिंदेंच्या बाजूला बसून पवारांचं विधान; फडणवीस भन्नाट उत्तर देत म्हणाले, “सासरच्या माणसांना…”

तसेच २० मे २०२२ रोजी म्हणजेच या बंडखोरीच्या महिनाभर आधी उद्धव ठाकरेंनी शिंदेंना मुख्यमंत्रीपद देऊ केलं होतं असंही आदित्य यांनी सांगितलं. “२० मे ला त्यांना ‘वर्षा’वर बोलवलेलं उद्धवसाहेबांनी आणि विचारलेलं तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचंय का? ही घ्या चावी आणि मुख्यमंत्री व्हा. मला काही मुख्यमंत्री होण्यात आनंद नाही. मला जबाबदारी दिली आहे ती स्वीकारली आहे. लोकांची सेवा करतोय, तुम्हाला व्हायचं असेल तर व्हा मुख्यमंत्री असं उद्धव ठाकरेंनी शिंदेंना सांगितलं होतं. तेव्हा ते रडले वगैरे. इतर जो काही असतो तो थोडा ड्रामा झाला. तुम्हीच मुख्यमंत्री, तुम्हीच आमच्यासाठी देव वगैरे वगैरे झालं,” असं आदित्य यांनी सांगितलं. तसेच, “दुसरे मंत्री ज्यांना आता डाऊनग्रेड केलं आहे. त्यांनी तर पोह्यांवर म्हणजे अन्नाची शपथ घेतली होती. काहीही झालं तरी आम्ही शिवसेना सोडणार नाही, तुमची साथ सोडणार नाही. गद्दारी करणार नाही. तेही निघून गेले,” असंही आदित्य म्हणाले.

नक्की वाचा >> ठाकरेंची मतदानाला दांडी! पवार-शेलार गटातून निवडून आल्यानंतर मिलिंद नार्वेकर स्पष्टच बोलले, “ते नाही आले तरी हरकत नाही, उमेदवारी…”

सरकार आणि यंत्रणा हातात असताना हे सगळं घडलं यासंदर्भात भाष्य करताना आदित्य यांनी, “ही यंत्रणा वापरायची किती, कशी आणि कधी हे मुख्यमंत्र्यांच्या हातात असतं. या मुख्यमंत्र्यांच्या हातात आहे की नाही ठाऊक नाही. पण नॉर्मली असतं. पण या यंत्रणेचा गैरवापर करायचा का? आधीच्या सरकारमध्ये फोन टॅपिंग वगैरे व्हायचे. ते करायचे म्हणून आम्ही पण करायचं का? किती लक्ष ठेवायचं?” असे प्रतिप्रश्न केले. तसेच महाविकास आघाडी सरकारच्या काळात कधीच यंत्रणांचा गैरवापर शिवसेनेनं केला नाही असंही आदित्य म्हणाले.

नक्की वाचा >> एकनाथ शिंदेंसंदर्भातील ‘ती’ एक चूक शिवसेनेला महागात पडली; आदित्य ठाकरेंचं रोखठोक मत

“असा एक तरी विरोधी पक्षातला किंवा भाजपाचा आमदार, खासदार सांगा ज्याला शिवसेना म्हणून किंवा सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार म्हणून अडीच वर्षात आम्ही सतावलेलं आहे. कोणाची तडीपारी काढलीय? कोणाच्या मागे यंत्रणाला लवलीय? कोणी असंही सांगू शकणार नाही की तुम्ही आमच्यावर नजर ठेवली. लोकशाही आहे. सगळ्यांनी सगळ्यांची कामं करावीत. कोणाची कामं अडवलेली नव्हती सगळ्यांची काम नीट सुरु होती,” असं आदित्य म्हणाले.