रत्नागिरी : अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे सुमारे सव्वादोन लाख रुपये किंमतीचा हापूस आंबा चार दिवस येथील रेल्वे स्थानकात पडून राहिल्याने समीर दामले बागायतदाराने रेल्वे प्रशासनाकडे नुकसानभरपाईची मागणी केली आहे. दोन आठवडय़ात ही भरपाई मिळाली नाही तर ग्राहक न्यायालयात दावा दाखल करण्याचाही इशारा दामले यांनी दिला आहे.

गेली काही वर्षे दामले रत्नगिरी स्थानकातून रेल्वेमार्गे दिल्लीला आंबा पाठवत आहेत. यंदाच्याही हंगामात  त्यांनी दोनवेळा रेल्वेने आंबे पाठवले. त्याच पध्दतीने गेल्या गुरुवारी ३७४ किलो आंबे लाकडी पेटीमधून दिल्लीला पाठवण्यासाठी रत्नागिरी रेल्वे स्थानकात पाठवले होते. पहिल्या दिवशी हजरत निजामुद्दीन गाडीत जागा नसल्याचे कारण देण्यात आले. शुRवारी राजधानी एक्स्प्रेसमध्ये अचानक दक्षिणेकडील रेल्वे स्थानकांवर मालगाडीत मटण भरण्यात आले. परिणामी रत्नगिरीतून आंबे पाठवण्यासाठी जागाच मिळालेली नाही. तेव्हा शनिवारी पाठवण्याची हमी देण्यात आली होती. पण शनिवारीही माल न पाठवता उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. सलग तीन दिवस आंबे जागेवरच राहिल्यामुळे खराब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दामले यांनी पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांना पत्र देऊन नुकसान भरपाईची मागणी केली आहे. यासंदर्भात पत्र रत्नागिरीतील स्थानक प्रमुखांकडे सादर केले आहे. रत्नागिरी रेल्वे स्थानक ते हजरत निजामुद्दीन (नवी दिल्ली) रेल्वे स्थानकापर्यंत आंबे पाठविण्यासाठी आरक्षण केले होते. परंतु दुर्दैवाने आंब्याच्या पेटय़ा पाठविण्यात आल्या नाहीत. आंबा नाशवंत असल्यामुळे तो खराब होणार आहे. यामध्ये २ लाख २४ हजार ४०० रुपयांचे नुकसान झाले आहे. हे पत्र मिळाल्यानंतर १५ दिवसांच्या आत भरपाईची रक्कम मिळावी अन्यथा ग्राहक न्यायालयात किंवा संबंधित अधिकाऱ्यांकडे दावा दाखल करण्याचा इशारा या पत्राद्वारे दिला असल्याचे दामले यांनी सांगितले.