शेतकरी संघटनांच्या नेत्यांची भूमिका

सरकारचे भाट असलेल्यांशी चर्चा करून शेतकऱ्यांचा संप मोडीत काढण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला असून मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरूच राहणार, अशी भूमिका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश प्रवक्ते महेश खराडे, बळीराजाचे अध्यक्ष बी. जी. पाटील यांनी शनिवारी जाहीर केली. संभाजी ब्रिगेड व बळीराजा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी मुख्यमंत्री फडणवीस आणि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या पुतळ्याचे दहन करून आंदोलन मोडीत काढण्याच्या प्रयत्नाचा निषेध केला.

गेले दोन दिवस सुरू असलेला संप मागे घेण्यात आल्याची घोषणा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शेतकरी प्रतिनिधी यांच्यासमवेत माध्यमांसमोर केली. मात्र या घोषणेनंतर संतप्त प्रतिक्रिया जिल्ह्णाात उमटल्या असून याचे पडसाद इस्लामपुरात राज्यमंत्री खोत यांच्या निवासस्थानासमोर झालेल्या आंदोलनावरून समोर आले. बळीराजा संघटनेचे अध्यक्ष बी. जी. काका पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि राज्यमंत्री खोत यांच्या प्रतिमेचे जोडय़ाने मारत दहन केले. शासनाने शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे सकारात्मक पाहण्याऐवजी दिशाभूल करीत आंदोलन मोडण्याचा प्रयत्न केला असून मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याची भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्री व राज्यमंत्री यांचा पुतळा दहन आंदोलनामध्ये बी. जी. काका पाटील, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सुयोग औंधकर, सचिन थोरबोले, सुधीर कदम, अमोल चव्हाण, अशोक सलगर, आबासाहेब काळे, गणेश काळे आदी सहभागी झाले होते.

शेतकरी आंदोलनाची पुढील दिशा निश्चित करण्यासाठी नाशिक येथे उद्या बठक होत असून या बठकीस आपण उपस्थित राहण्यासाठी जात असल्याचे पाटील यांनी सांगितले. केवळ दोघांशी चर्चा करून प्रश्न सुटतील असा भाबडा आशावाद दाखवून शासनाने आंदोलक शेतकऱ्यांची दिशाभूल केली असल्याचा आरोप त्यांनी केला.

दरम्यान, संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी शासनाने शेतकरी प्रतिनिधींशी चर्चा करीत असताना केवळ दोघांवर विसंबून राहून त्यांना काही तरी आमिष दाखवून संप मोडीत काढण्याचा प्रयत्न केला असून यातील एका प्रतिनिधीने शासनाने दिशाभूल केली असल्याचे कबूल केले आहे. यामुळे संप सुरूच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत लढा सुरूच राहील असे सांगून पाटील म्हणाले, सोमवारचा महाराष्ट्र बंद जाहीर केल्याप्रमाणे होणार आहे.

तर शासनाच्या भूमिकेमुळे संघटनांमध्ये संभ्रमावस्था निर्माण करण्यात मुख्यमंत्री यशस्वी ठरले असून नेतृत्वहीन आंदोलनामुळे चांगल्या संपाचा विचका झाल्याचे मान्य करीत शरद जोशीप्रणित शेतकरी संघटनेचे युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष संजय कोले यांनी आमची संघटना यातून बाजूला होत असली तरी पुन्हा नव्या दमाने शेतकरी कर्जमुक्तीसाठी आणि हमीभावासाठी संघर्ष करू असे सांगितले. सोमवारी होत असलेल्या महाराष्ट्र बंदमध्ये आमचा सहभाग नसला तरी या आंदोलनाला विरोधही करणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, शेतकरी संपामुळे बाजारात संभ्रमावस्था निर्माण झाल्याने सांगलीच्या बाजारात तुरळक उलाढाल आज सुरू राहिली असल्याचे बाजार समितीचे सचिव प्रकाश पाटील यांनी सांगितले. आज गुळाचे सौदे करण्यात आले. मात्र कांदा, बटाटा, लसूण यांची आवक अल्प प्रमाणात होती. भाजीबाजारावर या संपाचा परिणाम झाला असून स्थानिक उत्पादकाकडून भाजीपाला शिवाजी मार्केटमध्ये अल्प प्रमाणात सौद्यासाठी आला. यामुळे भाजीपाल्याचे दर भडकले आहेत. उद्या रविवारी सौदे बंद असल्याने बाजार समिती बंद राहणार असली तरी भाजीबाजारावर याचे परिणाम होण्याची चिन्हे आहेत