रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील खालचा पगारवाढ येथून चार दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या ३३ वर्षीय विवाहितेचा छिन्नविच्छिन्न अवस्थेतील मृतदेह सोमवारी भगवती किल्ल्यासमोरील ‘कपल पॉइंट’खालच्या दरीत आढळल्याने शहरात खळबळ उडाली आहे. या विवाहितेने आत्महत्या केली की घातपात झाला, याचा शोध शहर पोलिसांनी सुरू केला आहे. दरम्यान घातपाताच्या शक्यतेने या प्रकरणी दोघा संशयितांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले असल्याचे समजते. रितेश घाणेकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची पत्नी सौ. तन्वी घाणेकर (वय ३३ वर्षे) २९ सप्टेंबर रोजी संध्याकाळी सव्वासातच्या सुमारास, बाजारात जाऊन येते.
उशीर झाला तर जेवण करून घ्या, असे मुलीला सांगून घरातून बाहेर पडल्या. त्या दुचाकीवरून (एमएच ०८ एक्स ७११६) बाजारात गेल्या होत्या. रात्री उशिरापर्यंत घरी परतल्या नाहीत. दुसऱ्या दिवशी दुपापर्यंत त्या घरी न आल्याने पती रितेश यांनी ३० सप्टेंबर रोजी शहर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. मात्र त्यांचा शोध लागला नव्हता; पण तन्वी यांची दुचाकी भगवती किल्ल्यानजीक दोन दिवसांपूर्वी आढळून आली होती. त्यानंतर पोलिसांनी त्या परिसरात शोधमोहीम हाती घेतली; परंतु तपास लागला नव्हता. अखेर सकाळपासून भगवती किल्ला, कपल पॉइंट, टकमक पॉइंट, लाइट हाऊस परिसरात समुद्राच्या बाजूने शोध घेण्याची सूचना पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांनी पोलीस अंमलदारांना दिली. त्यानुसार दुपारी ४च्या सुमारास भगवती किल्ल्यासमोरील ‘कपल पॉइंट’खाली शोध घेत असताना सुमारे २०० फूट खोल दरीमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळून आला. तेथून तो बाहेर काढण्यासाठी मार्ग नसल्याने पोलिसांनी सायंकाळी रॅपिलगच्या चमूला पाचारण केले . त्यानंतर दोराच्या साहाय्याने मृतदेह बाहेर काढण्याची मोहीम रात्री उशिरापर्यंत चालू होती. हा मृतदेह तन्वीचा असल्याचे पतीने कपडय़ांवरून ओळखले आहे.



