कोकणातील नद्यांचे झपाटय़ाने प्रदूषित होत चाललेले स्वरूप बघता येथे व्यापक जनचळवळीची गरज असल्याचे मत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह यांनी व्यक्त केले.
कोकण भूमी प्रतिष्ठान आणि अन्य सहकारी संस्थांतर्फे गेल्या १५ जानेवारीपासून डॉ. राजेंद्रसिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत जलचेतना परिक्रमा आयोजित करण्यात आली आहे. कोकणातील पाण्याचा विचित्र प्रश्न कायमस्वरूपी मिटवण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्यासाठी या उपक्रमाअंतर्गत व्यापक जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यामध्ये आज येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात डॉ. राजेंद्रसिंह यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ते म्हणाले, सध्याचा काळ तिसऱ्या युद्धाचे शतक मानला जातो. हे युद्ध पाण्यावरून पेटण्याचा धोका आहे. कारण गेल्या कित्येक वर्षांत विविध प्रकारचे आधुनिक शिक्षण दिले गेले तरी पृथ्वी, निसर्ग, जंगल, मातीच्या आरोग्याचे शिक्षण दिले गेलेले नाही. त्यामुळे कोकणातील सध्याचे निसर्गसौंदर्य पाहता येथे स्वर्ग असल्याचा भास होत असला तरी हा प्रदेश नैसर्गिकदृष्टय़ा नरक होण्याच्या वाटेवर आहे. विविध प्रकारच्या मानवनिर्मित आपत्तींनी ही परिस्थिती निर्माण केली आहे. महाराष्ट्राच्या तुलनेत अतिशय कमी पाऊस पडत असूनही राजस्थानातील शेतकऱ्यांनी आत्महत्या केली नाही. कारण तेथे नद्या व विहिरींच्या पुनरुज्जीवनाचा व्यापक कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. येथे तसे होताना दिसत नाही. कोकणातील नद्यांवर मानवानेच अतिक्रमण केले असून या परिसरातील प्रदूषणालाही तोच कारणीभूत आहे. हे चित्र बदलण्यासाठी जलसाक्षरता अभियान हाती घेण्याची गरज आहे. त्यामध्ये स्थानिक ग्रामस्थ किंवा नागरिकांबरोबरच लोकप्रतिनिधींमध्येही जलसाक्षरता निर्माण करणे आवश्यक आहे.
या जलअभियानाच्या माध्यमातून गांधारी, जगबुडी, अर्जुना व जानवली या चार नद्यांचे पुनरुज्जीवन करण्यात येणार असल्याचे परिक्रमेचे संयोजक व कोकण भूमी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संजय यादवराव यांनी या प्रसंगी सांगितले. गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातर्फे गोळप येथील नदीच्या पुनरुज्जीवनाचा यशस्वी प्रयोग प्रा. डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई यांनी स्लाइड्सच्या मदतीने सादर केला. रत्नागिरी एज्युकेशनच कार्याध्यक्ष अ‍ॅडव्होकेट विलास पाटणे, प्रा. डॉ. किशोर सुखटणकर, किशोर धारिया इत्यादींनी मनोगत व्यक्त केले. प्रा. महेश नाईक यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
रायगड जिल्ह्यापासून सुरू झालेल्या या परिक्रमेचा समारोप उद्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणार आहे.