गोंदियामधील तिरोडा नगरपरिषदेच्या निवडणुकीत प्रफुल्ल पटेल यांच्या वर्चस्वाला हादरा बसला आहे. तिरोडामध्ये राष्ट्रवादीची सत्ता कायम असली तरी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा पराभव झाला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीची अवस्था ‘गड आला, पण सिंह गेला’ अशी झाली आहे.

गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा नगरपरिषदेची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेससाठी प्रतिष्ठेची होती. प्रफुल्ल पटेल यांनी या भागात प्रचारसभा घेतल्या होत्या. राजेंद्र जैन आणि दिलीप बनसोडे यांनीही निवडणुकीत लक्ष घातले होते. तिरोडा नगरपरिषदेसाठी गेल्या वेळी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता होती. १७ पैकी १६ जागांवर राष्ट्रवादीचा विजय झाला होता. पण यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला हादरा बसला आहे.

सोमवारी झालेल्या मतमोजणीत तिरोडा नगरपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसला १७ पैकी ९ जागांवर विजय मिळाला आहे. पाच जागांवर भाजप आणि दोन जागांवर शिवसेनेचा विजय झाला आहे. तर एका जागेवर अपक्ष उमेदवार निवडून आला आहे. सर्वाधिक नगरसेवक निवडून आले असले तरी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा पराभव झाला आहे. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या ममता बैस आणि भाजपच्या सोनाली देशपांडे यांच्यात प्रमूख लढत होती. यात सोनाली देशपांडे यांचा ११० मतांनी विजय झाला आहे.

तिरोड्यात राष्ट्रवादीसाठी ही धोक्याची घंटा असल्याचे मानले जाते. विजय मिळाला असला तरी नगरसेवकांचे संख्याबळ कमी झाले आहे. भंडारा आणि गोंदिया लोकसभा मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यात झालेल्या पालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला अपेक्षित यश मिळवता आले नव्हते. त्यामुळे लागोपाठ निराशाजनक कामगिरी झाल्याने प्रफुल्ल पटेल यांच्या वर्चस्वाला हादरा बसल्याची चर्चा रंगली आहे.