सर्वानाच लग्न थाटात करण्याची हौस असते. नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांच्या या हौसेवर पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी मतप्रदर्शन केले. त्यानंतर जाधव यांनी दिलगिरी व्यक्त केल्याने या प्रकरणी आता पडदा पडला आहे. आमच्या नेत्यांनी मनाचा मोठेपणा या प्रकरणात दाखविला आहे हे लक्षात घ्या, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
खासदार सुप्रिया सुळे आलेल्या असताना राज्यमंत्री भास्कर जाधव यांच्या कन्या व सुपुत्राच्या लग्नाच्या विषयावर त्यांनी भाष्य केले. या वेळी आमदार दीपक केसरकर, नगराध्यक्ष बबन साळगावकर, अमित सामंत, बाळ भिसे, अबीद नाईक आदी उपस्थित होते.
राज्यातील साडेसहा हजार युवतींना प्रशिक्षण दिले जात आहे. येत्या ८ मार्चपर्यंत प्रशिक्षण सुरू होऊन राज्यात युवतींचा सामाजिक व राजकीय प्रवास सुरू होईल असे त्यांना सांगताना राज्यात महिलाविषयक धोरण, राज्य महिला आयोग अध्यक्ष निवडीबाबत आग्रही आहोत, असे खासदार सुळे म्हणाल्या.
महिला आरक्षण मिळावे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसनेच मुद्दा लावून धरला आहे. संसदेत व विधानसभेतही आरक्षण मिळायला हवे, असे सांगून आमदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, सिंधुदुर्गात आमदार दीपक केसरकर व राष्ट्रवादी पक्षाच्या मागे सत्ता व पक्षसंघटना आहे. त्यामुळे त्यांनी काम करत राहावे, असा सल्ला दिला.
उपमुख्यमंत्री अजित पवार पैसे मोजण्याच्या गुंगीत असतात असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टीका केली, त्यावर बोलताना खासदार सुळे म्हणाल्या, आंब्याच्या झाडावर सर्वच टीका करतात. अजित पवार चांगले काम करत आहेत त्यामुळे टीका होत आहे, असे खासदार सुळे म्हणाल्या.
महिलांवर होणाऱ्या अत्याचारासाठी नवीन कायदे करण्यापेक्षा आहे त्या कायद्याची अंमलबजावणी करावी. पोलिसांची आदरयुक्त भीती हवी, असे सांगून सुळे यांनी केंद्र व राज्याच्यी धोरणांची अंमलबजावणी हवी असे स्पष्ट केले.
दुष्काळी भागासाठी सर्वच जण गंभीर आहेत. पाण्याची पातळीच घटली आहे. त्यामुळे ही पातळी वाढीसाठी योजना हवी. त्यासाठी सरकार निश्चितच प्रयत्न करेल, असे खासदार सुळे म्हणाल्या.