योगविद्येला अधिक लोकप्रियता मिळवून देऊन अधिकाधिक प्रमाणात ती वापरायला हवी असे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग तसेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. सातव्या योगदिनानिमित आयोजित वेबिनारद्वारे ते संबोधित करत होते.

यावेळी गडकरी म्हणाले की, योगसाधनेमुळे लोकांच्या जीवनातून सर्व आजार आणि अस्वस्थता यांचे निराकरण होईल. योगाच्या जागतिकीकरणासाठी शक्य त्या सर्व तंत्रज्ञानविषयक सुविधांच्या मदतीने, विविध भाषांतून, ग्रामपंचायत स्तरावर योगाच्या शिकवण्या आणि योग प्रशिक्षण वर्ग आयोजित केले पाहिजेत. योग हे एक शास्त्र असून ते अनुभवता येऊ शकते आणि त्याचे लाभ कधीही न संपणारे आहेत, असे त्यांनी सांगितले.

आणखी वाचा- योग दिन विशेष : रामदास आठवलेंनी खास कवितेच्या माध्यमातून दिला संदेश, म्हणाले….

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगाला जागतिक प्रघाताचे रूप दिले असून योगसाधनेचे लाभ आणि महत्त्व यांच्याबद्दल लोकांमध्ये जाणीव निर्माण करण्यासाठी हा विशेष दिवस जागतिक पातळीवर साजरा करण्याची सुरुवात केली, असेही गडकरी म्हणाले.

केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी देखील या वेबिनारला संबोधित केले. ते म्हणाले की, सात वर्षांच्या कालावधीसाठी आयुष मंत्रीपदाची जबाबदारी पार पाडल्यामुळे योगाला माझ्या जीवनात आणि मनात नेहमीच एक विशेष स्थान आहे. देशभरातील सर्व योगसाधकांच्या समर्पित वृत्तीमुळे योगाला आज घराघरात नाव मिळाले आहे. योगसाधना हा प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनशैलीचा भाग व्हायला हवा असे मत देखील नाईक यांनी व्यक्त केले.