दुष्काळाची तीव्रता वाढत असतानाच राज्यावर गारपिटीच्या रूपाने अस्मानी संकट कोसळले. दुष्काळग्रस्त व गारपीटग्रस्तांना मदत देण्यासाठी राज्य शासन अथक प्रयत्न करीत असताना काही लोक परिस्थितीचे गांभीर्य लक्षात न घेता नकला करीत सुटले आहेत. अशा नकलांनी जनतेचे मनोरंजन होईल, परंतु राज्यापुढील प्रश्न सुटणार नाहीत. नौटंकी खूप झाली, आता कामे करा, या शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नामोल्लेख न करता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले. कोल्हापूर येथे झालेल्या सभेत राज यांनी उपमुख्यमंत्र्यांसह अनेकांची नक्कल केली होती. तो धागा पकडून पवार यांनी सुनावले.
शिवसेनेतून हकालपट्टी झाल्यानंतर राष्ट्रवादीत दाखल झालेल्या सुनील बागूल समर्थकांच्या मेळाव्यात ते बोलत होते. महाराष्ट्र पिंजून काढण्याच्या नावाखाली ते ऑर्केस्ट्रा चालवित आहेत. नकला करून जनतेचे प्रश्न सुटत नाही. ही नौटंकी खूप झाली. आता कामे करा, असा टोलाही पवार यांनी लगावला. नाशिक महापालिकेत मनसेला सत्ता मिळाली. परंतु वर्ष उलटूनही कोणतीही कामे झालेली नाहीत. मराठी माणसाचा मुद्दा पुढे करून भावना भडकविण्यापेक्षा दुष्काळावर मात करण्यासाठी जनतेला बळ द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. राष्ट्रवादी हा विकासाच्या प्रश्नावर बेरजेचे राजकारण करणारा एकमेव पक्ष आहे. सर्व घटकांना बरोबर घेऊन विकासाचे राजकारण आमच्याकडून केले जाते. दुष्काळाच्या मुद्यावर केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार राज्याचा दौरा करीत आहेत. खा. सुप्रिया सुळे महिलांच्या समस्यांवर जनजागृती करीत आहेत. आम्ही जनतेच्या प्रश्नांसाठी मैदानात उतरलो आहोत. शिवराळ भाषा आम्हाला येत असली तरी त्यामुळे जनतेचे प्रश्न सुटणार नाहीत याची जाणीव असल्याने आम्ही अशा नौटंकीकडे लक्ष देत नाही. महाराष्ट्र दुष्काळाने होरपळत आहे. जनतेचे प्रश्न समजून घेण्याची क्षमता केवळ राष्ट्रवादीमध्येच आहे. आम्ही उभारलेल्या बँका, कारखाने व शिक्षण संस्थांच्या माध्यमातून मराठी माणसाचेच भले झाले आहे, अशी टिप्पणीही पवार यांनी केली.
यावेळी भुजबळ यांनी शिवसेनेवर टीका केली. शिवसेनेत कॉईनबॉक्सचे राजकारण आहे. शिवसेनेने ‘जय महाराष्ट्र’ म्हटले तरी त्यांचा राज्यात कधीच जय झाला नाही, असेही ते म्हणाले. या वेळी प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड, खा. समीर भुजबळ, आ. हेमंत टकले, माजी आमदार दिलीप बनकर, अर्जुन टिळे, शोभा मगर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शरद कोशिरे आदी उपस्थित होते.