मराठी शुध्दलेखनाविषयी अनेक प्रवाद आहेत. शुध्दलेखनात वेगवेगळी पध्दत अंगीकारली जात असल्याने नियम कोणते वापरावेत, असा प्रश्न अनेकांना पडतो. ही बाब लक्षात घेऊन येथील संगणकतज्ज्ञ सुनील खांडबहाले यांनी सुलभ पध्दतीने शुध्दलेखन तपासणीसाठी सहाय्यभूत ठरेल अशी खास ‘शुध्दलेखन तपासक संगणक प्रणाली’ विकसित केली आहे. कोणतेही प्रशिक्षण न घेता कोणालाही ही प्रणाली सहजपणे वापरता येईल. इंग्रजी ‘स्पेलचेकर’च्या धर्तीवर या प्रणालीची रचना आहे.
मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून मुंबईत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते या प्रणालीचे उद्घाटन करण्यात आले. मराठी भाषेला हजारो वर्षांची परंपरा असली तरी प्रचलित असलेल्या शुध्दलेखनाला मतमतांतराची आणि वादांची पाश्र्वभूमी आहे. संगणकावर मराठी लेखन करताना अनेकदा शुध्दलेखनाच्या चुका होतात. कधीकधी तर त्या गंभीर स्वरुपाच्या असतात. त्यामुळे अर्थाचा अनर्थ होतो. मराठी भाषेत अनेक शब्द लिहिताना वेलांटी, उकार हे -हस्व हवे की दीर्घ तेच कळत नाही. मूळ शब्दासोबत विभक्ती प्रत्यय असल्यास गोंधळात भर पडते. काही जोडशब्दांच्याही बाबतीत तसेच होते. अशावेळी मग काही संदर्भ वापरणे अथवा तज्ज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय पर्याय नसतो. अलिकडे मराठी भाषेत वाढलेल्या इंग्रजी शब्दांच्या पाश्र्वभूमीवर विद्यार्थ्यांनाही मराठीतील शुध्दलेखन म्हणजे नेमके काय हे कळेनासे झाले आहे. मग नाईलाजास्तव शब्द चुकीच्या पध्दतीने लिहिले जातात. पुन्हा पुन्हा ते अशुध्द स्वरुपात लिहिण्या-वाचण्यात आल्याने ते तसेच रुढ होण्याची भीती असते. या समस्येवर खांडबहाले यांनी संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून उपाय शोधला आहे.
मराठी भाषेत सर्वाना वापरता येईल अशी शुध्दलेखन तपासणीची व्यवस्था नाही. हे लक्षात घेऊन सलग दोन वर्षांच्या मेहनतीतून शुध्दलेखनास मदतनीस ठरू शकेल अशी मराठी भाषा शुध्दलेखन तपासक प्रणाली विकसित केली आहे. देशात मायक्रोसॉफ्ट विंडोज् वापरण्याचे प्रमाण अधिक असल्याने ही प्रणाली सर्वप्रथम विंडोजसाठी तयार करण्यात आली आहे. ती ‘युनिकोड’मध्ये असून ‘मायक्रोसॉफ्ट ऑफीस’ मध्ये सहजपणे वापरता येईल. वर्ड, एक्सेल अथवा पॉवरपॉइंटमध्ये आपण इंग्रजी ‘स्पेलचेकर’ वापरतो. त्याच धर्तीवर मराठी शुध्दलेखन तपासक प्रणाली वापरता येईल. लिहिताना चुकीचे मराठी शब्द लाल रंगात दिसू लागतील. त्या शब्दावर ‘माऊस’ची उजव्या बाजूची कळ दाबून योग्य शब्दाची निवड करता येईल. या प्रणालीत नवीन शब्द टाकण्याची सुविधा असल्याने जसजसा वापर वाढत जाईल, तसतशी ही प्रणाली अधिक प्रभावी होईल, असे खांडबहाले यांचे म्हणणे आहे. प्रारंभी ही प्रणाली अधिक अचूक आणि निर्दोष होण्याच्या दृष्टीने योगदान देऊ इच्छिणाऱ्या ठराविक व्यक्तींना ती वितरित केली जाणार आहे. त्यासाठी इच्छुकांनी http://www.khandbahale.com या संकेतस्थळावर मागणी नोंदवावी. पुढील तीन ते चार महिन्यात ही प्रणाली सर्वासाठी उपलब्ध होणार आहे. मराठीप्रेमी खांडबहाले यांनी आतापर्यंत मराठीसह तब्बल २२ भारतीय भाषांमध्ये शब्दकोष निर्माण करून ते संगणक, भ्रमणध्वनी तसेच लघूसंदेश स्वरूपात मोफत उपलब्ध करून दिले आहेत.

loksatta kutuhal features of self aware artificial intelligence
कुतूहल : स्वजाणीव- तंत्रज्ञानाची वैशिष्टये..
British scientist Peter Higgs waited 48 years to present his research
आइनस्टीनलाही प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली होती; तर इतरांची काय कथा?
Loksatta kutuhal Application of computer vision
कुतूहल: संगणकीय दृष्टीचे उपयोजन
Loksatta kutuhal Development and importance of computer vision
कुतूहल: संगणकीय दृष्टीचा विकास आणि महत्त्व