कराड : शेतकरी विरोधी जाचक कायदे रद्द व्हावेत आणि माहिती अधिकार कायदा सहकारी संस्थांनाही लागू करण्यात यावा आदी मागण्या करत शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी वेळप्रसंगी सहकारमंत्र्यांबरोबरच अन्य मंत्र्यांच्या घरावरही शेतकऱ्यांचे मोर्चे काढू असा इशारा शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी दिला.कराड तालुक्यातील काले येथे उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्यानंतर जाहीर सभेत ते बोलत होते. शेतकरी संघटना क्रांतिसिंह नाना पाटील ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष विजय पाटील, राजेंद्र बर्गे-पाटील, राजेंद्र मोहिते, अशोक पाटील, उत्तम खबाले आदींची प्रमुख उपस्थिती होती.


रघुनाथदादा म्हणाले, की क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कार्यकर्तृत्वाने गाजलेला हा जिल्हा असून, शेतकऱ्यांच्या लढाईस काले या क्रांतिकारी भूमीतून सुरुवात झाली आहे.शेतकऱ्याची बैठी पाणीपट्टी पूर्ण माफ झाली पाहिजे. शेतकरी हितासाठी अनेक साखर कारखाने इथेनॉल निर्मिती करणार असल्याने दोन कारखान्यांमधील अंतराची अट रद्द करण्यात यावी, शेती उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांना मताचा अधिकार प्राप्त व्हावा. सेवा सोसायटीच्या सभासदांना जिल्हा बँकेचे संचालक निवडण्याचा मताचा अधिकार मिळावा.

राज्यकर्त्यांनी निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने पाळावीत, शेतकऱ्यांना कर्ज व वीज देयकमुक्त करावे. ग्रामपंचायत हद्दीतील व शेतात असणारे विजेचे खांब, रोहित्र, विजेच्या तारा यावर भाडे आकारणी करण्याचा ठराव ग्रामपंचायतींनी करावा अशा मागण्या करीत शेतकरी व ग्रामीण जनतेच्या प्रश्नांवर सरकारला घेरणार असल्याचाही इशारा रघुनाथ पाटील यांनी यावेळी बोलताना दिला.