जिल्हय़ात उन्हाच्या झळा वाढत असताना टँकर मंजुरीसाठी मात्र विलंब होत आहे. याबाबत सदस्यांनी तक्रारी केल्याने जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठलराव लंघे जिल्हाधिका-यांची भेट घेणार आहेत. जिल्हय़ात सध्या ३१ टँकरचे प्रस्ताव तहसीलदार व जिल्हाधिका-यांकडे पडून आहेत.
जि.प.च्या काल, बुधवारी झालेल्या जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीच्या सभेत टँकर मंजुरीतील विलंबाबद्दल सदस्यांनी तक्रारी केल्या. सध्या १६० गावे, ६४२ वाडय़ांतील साडेतीन लाखांवर लोकसंख्येला २०४ टँकरने ५४९ खेपा करून पाणीपुरवठा केला जात आहे. शेवगाव तालुक्यातील १५, पाथर्डी व पारनेरमध्ये प्रत्येकी ४, जामखेड ३, कोपरगाव व अकोले प्रत्येकी २ व नेवासे १ असे एकूण ३१ टँकरचे प्रस्ताव मंजुरीअभावी प्रतीक्षेत आहेत.
टंचाई कालावधीसाठी ६९७ विंधन विहिरी घेण्याचे प्रस्तावित होते, पैकी भूजल सर्वेक्षण विभागाने ४५० प्रस्ताव पात्र असल्याचे दाखले दिले. त्यातील १२१ प्रस्तावांना जिल्हाधिका-यांनी मान्यता दिली, ७७ बोअर घेण्यात आले, ७६ बोअरला पाणी लागले. ३४ ठिकाणी हातपंप बसवले गेले आहेत. गावांच्या वैयक्तिक पाणी योजनांसाठी जि.प.ला ५ कोटी रुपयांपर्यंत मंजुरीचे आधिकार प्राप्त झाले आहेत, त्याप्रमाणेच प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजनांसाठीही जि.प.ला ५ कोटी रुपयांपर्यंत मंजुरीचे अधिकार द्यावेत, अशा मागणीचा ठराव करण्यात आला. प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजनांची १०० टक्के वीजबिले सरकारने भरावीत, अशीही सदस्यांनी मागणी केली.
सभेस उपाध्यक्ष मोनिका राजळे, सभापती कैलास वाकचौरे, बाबासाहेब तांबे, हर्षदा काकडे, शाहुराव घुटे, सदस्य सुभाष पाटील, सुनील गडाख, शारदा मोरे, सुदाम पवार, सुनीता नेटके, केशव भवर, राजेंद्र कोठारी तसेच अधिकारी उपस्थित होते.