खूनसत्राने करवीरनगरी भयभीत झाली असताना दोघा व्यक्तींचे खून करणाऱ्या एका आरोपीस अटक करण्यात कोल्हापूर पोलिसांना गुरुवारी यश आले आहे. मूळच्या छत्तीसगडमधील दिलीप कुँवरसिंह लहेरिया याने रेल्वेस्थानकाजवळील दोन खून केल्याची कबुली दिली. सीरियल किलर प्रकरण चर्चेत असताना एक आरोपी पोलिसांच्या हाती लागल्याने कोल्हापूरकरांनी थोडातरी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. पोलिसांनी मात्र हा सीरियल किलरचा प्रकार नसल्याचा दावा केला आहे. तथापि आणखी आठ गुन्हय़ांतील आरोपी कोण, हा प्रश्न मात्र अनुत्तरित असून ते शोधण्याचे आव्हान पोलीस यंत्रणेसमोर आहे.    
सीरियल किलर हत्याकांडामुळे कोल्हापूर शहरामध्ये दहशतीचे वातावरण आहे. पंधरवडय़ात पाच खून झाल्याने पोलीस यंत्रणाही चक्रावून गेली होती. याची गंभीर दखल घेत गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी मुंबई क्राइम ब्रँचचे विशेष पथक कोल्हापुरात पाठविण्याचा निर्णय घेतला होता. कोल्हापुरातील पोलीसही खुन्याचा शोध घेण्यासाठी जंगजंग पछाडत होते. बुधवारी मध्यरात्री पोलिसांच्या प्रयत्नांना यश आले. दोन व्यक्तींचा खून करणाऱ्या आरोपीला शाहूपुरी व लक्ष्मीपुरी पोलिसांच्या पथकाने मध्यरात्री पकडले.     
दिलीप कुँवरसिंह लहेरिया असे आरोपीचे नाव आहे. तो मूळचा छत्तीसगड येथील आहे. पुणे येथे तो साडेतीन महिने राहायला होता. तो विवाहित असून पत्नी व मुलीसमवेत तो राहात होता. किरकोळ स्वरूपाची कामे करून तो उदरनिर्वाह चालवत असे. त्याची पत्नी मुलीला घेऊन गावाकडे परत गेली होती, त्यामुळे तो वैफल्यग्रस्त झाला होता. पत्नीच्या शोधासाठी तो गावी गेला होता, पण त्याला पत्नी व मुलगी भेटली नव्हती. निराश होऊन तो अकरा महिन्यांपूर्वी कोल्हापूरला रेल्वेने आला होता. भिक्षा मागूनच तो जगत होता. अधूनमधून हुबळी, धारवाड, मिरज येथेही रेल्वेने जात होता. १३ जून रोजी रेल्वेस्थानकाजवळील बस थांब्याजवळ रात्रीच्या वेळी तो झोपला होता. त्याच्याजवळ असलेल्या तीन-चार भिकाऱ्यांनी त्याच्या हिंदी बोलण्यावरून चिडविण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे संतप्त झालेल्या लहेरिया याने बाजूला पडलेल्या लाकडी दांडक्याने चिडविणाऱ्या एका व्यक्तीच्या डोक्यात जोरदार प्रहार केला. त्यामुळे ती व्यक्ती जागीच ठार झाली. तर इतर भिकाऱ्यांनी तेथून पळ काढला. १५ जून रोजी तो परिख पुलाजवळ रात्रीच्या वेळी बसला होता. रस्त्यावर पडलेला वडापाव तो खात असल्याने दुसऱ्या एका भिकाऱ्याने त्याला हटकले. त्याचा राग आल्याने लहेरिया याने वीट मारून त्या भिकाऱ्याचा खून केला. १३ जून रोजी लहेरिया याने केलेली मारहाण व खून रेल्वेस्थानकाजवळ झोपलेल्या एका भिकाऱ्याने पाहिली होती. त्याने ही माहिती तपास करणाऱ्या एका पोलिसाला दिली. पोलिसांनी लहेरिया याच्यावर पाळत ठेवली होती. बुधवारी रात्री शाहूपुरी व लक्ष्मीपुरी पोलीस लहेरियाचा खासगी वाहनातून पाठलाग करीत होते. पंचगंगा घाटातून बाहेर पडलेला लहेरिया कोंडाओळ मार्गे व्हीनस कॉर्नरकडे जात होता. तो गोकुळ हॉटेलजवळ आला असताना पोलिसांच्या गाडीत असलेल्या भिकाऱ्याने त्याला ओळखले. त्यासरशी लक्ष्मीपुरी पोलिसांनी गाडीतून उतरून लहेरिया याला ताब्यात घेतले. त्याला पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर दोन खून केल्याची कबुली दिली, अशी माहिती पोलीस अधीक्षक विजयसिंह जाधव यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत बोलतांना दिली. दरम्यान, कोल्हापुरात झालेले खून हे सीरियल किलरकडून झाले नसल्याचे मत जाधव यांनी व्यक्त केले.
खून कोणी केले आहेत याचा शोध पोलीस घेत आहेत. त्यामध्ये लवकरच यश येईल, असा दावाही त्यांनी केला. कोल्हापूर पोलिसांनी दोन खून करणाऱ्या आरोपीला पकडल्याबद्दल प्रजासत्ताक संघटनेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी पोलीस यंत्रणेचे अभिनंदन केले. मात्र आणखी आठ खून कोणी केले याचा तपास होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. मुंबई विशेष पोलीस पथकाला परत न पाठवता त्यांची मदत घेऊन कोल्हापूर पोलिसांनी सीरियल किलर प्रकरणाचा मुळापर्यंत पाठपुरावा करावा, अशी मागणी त्यांनी केली. सर्व खुनाचे आरोपी पकडले जात नाहीत तोपर्यंत प्रजासत्ताक संघटनेकडून या प्रकरणाचा पाठपुरावा केला जाणार असल्याचे दिलीप देसाई यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.    
गेल्या अडीच महिन्यांच्या कालावधीत भिकारी, बेवारसांचा खून होण्याच्या दुर्दैवी प्रकाराचा छडा लावण्यास कोल्हापूर पोलिसांना यश आल्याचे नमूद करून गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी अन्य खुनाच्या प्रकरणातील गुन्हेगार सापडणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले. अशा आरोपींवर निश्चितपणे कारवाई होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.