सभेपूर्वी प्रवेशद्वाराला कुलूप ठोकले, पोलीस बळाचा वापर; आयुक्त, महापौरांविरोधात पोलिसात तक्रार

चंद्रपूर : महापालिकेत मंगळवारी पुन्हा एकदा आमसभेच्या पार्श्वभूमीवर चांगलाच हंगामा झाला. ऑनलाईन आमसभा सुरू होण्यापूर्वीच सत्ताधारी भाजपने महापालिकेच्या दोन्ही प्रवेशद्वारांना कुलूप लावले. तथा पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात केला. पोलिसांनी अधिकाराचे उल्लंघन करीत गटनेत्यांना सभागृहात आणि नगरसेवकांना त्यांच्या कक्षात जाण्यापासून रोखले. त्यामुळे चांगलाच गोंधळ झाला. यावेळी शहर विकास आघाडीचे गटनेते पप्पू देशमुख, काँग्रेसचे नगरसेवक नंदू नागरकर, सुनीता लोढिया, देवेंद्र बेले यांनी महापौर कंचर्लावार आणि आयुक्त राजेश मोहिते यांची पोलिसात तक्रार करत या प्रवेशबंदी विरोधात आवाज उठवला.

मंगळवारी दुपारी एक वाजता ऑनलाईन आमसभा सुरू झाली. तत्पूर्वी मनपाच्या दोन्ही प्रवेशद्वाराला कुलूप ठोकण्यात आले. कायदा व सुव्यवस्था ठेवण्यासाठी मनपा आयुक्त राजेश मोहिते यांनी शहर पोलीस ठाण्याला पत्र दिले. त्यानंतर पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला. ऑनलाईन आमसभेत गटनेत्यांना उपस्थित राहण्याचे पत्र सर्व गटनेत्यांना होते. तसेच पोलिसांकडे गटनेत्यांच्या नावाची यादी दिली होती. इतर नगरसेवकांना नगरसेवक कक्षातून सभेला ऑनलाईन उपस्थित राहण्याची परवानगी होती.

आमसभेला सुरुवात झाली. महापौरांसह काही पक्षाचे गटनेते सभेला उपस्थित होते.  सभेसाठी शहर विकास आघाडीच गटनेते पप्पू देशमुख आले. तर काँग्रेसचे नगरसेवक नंदू नागरकर, सुनीता लोढिया, देवेंद्र बेले, अशोक नागापुरे, अमजद अली आले. मात्र त्यांना प्रवेशद्वारावरच पोलिसांनी रोखले. वारंवार विनंती करूनही पोलिसांनी देशमुख यांना आत जाऊ दिले नाही. त्यावेळी महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर काँग्रेस नगरसेवकांचे आंदोलन सुरु होते. त्या नगरसेवकांनाही नगरसेवक कक्षात जाण्यापासून अडवण्यात आले. पोलीस आणि सत्ताधाऱ्यांच्या दडपशाही विरोधात  देशमुख यांच्यासह काँग्रेसचे नगरसेवक अर्धनग्न झाले. त्यांनी द्वाराला लाथा मारणे सुरू केले. त्यामुळे  तणाव निर्माण झाला. तर काँग्रेसचे नंदू नागरकर यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या नगरसेवकांनी सद्बुद्धी आंदोलनाला सुरुवात केली. यावेळी प्रवेशद्वारासमोर होम हवन केले. तसेच डायका वाजवत निषेध नोंदवला.

चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राचे पाचशे मेगावॅटचे दोन संच महापालिका हद्दीत येते. मात्र त्यांच्याकडून अद्याप कर वसूल पाहिजे आणि मनपातील घोटाळ्यांची चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. आंदोलनात काँग्रेसचे गटनेते डॉ. सुरेश महाकुलकर, नगरसेवक सुनीता लोढिया, अशोक नागपुरे, संगीता भोयर, अमजद मन्सूर अली, देवेंद्र बेले, ललिता रेवालीवर, कलामती यादव आदी सहभागी झाले होते. तिकडे पप्पू देशमुख यांच्या नेतृत्वात नगरसेवक शहर पोलीस ठाण्यात पोहचले. त्यांनी महापौर कंचर्लावार आणि आयुक्त मोहिते यांच्या विरोधात पोलिसात तक्रार केली.

विशेष म्हणजे, शहरचे ठाणेदार सुधाकर अंभोरे यांनी पोलिसांनी कुणालाच थांबवले नाही, असा दावा केला. पोलिसांना लेखी पत्राद्वारे फक्त गटनेत्यांना आत प्रवेश देण्याची विनंती केली होती, असे आयुक्त मोहिते यांनी सांगितले.  महापालिकेच्या दहा वर्षांच्या काळात नगरसेवक आणि सर्वसामान्य नागरिकांना मनपात प्रवेश करण्यापासून रोखण्याचा नवा पायंडा सत्ताधारी भाजपने पाडला.  सामान्य नागरिकही आत प्रवेशासाठी तब्बल तीन तास मनपाच्या समोर उभे होते.

अकोला महापालिकेचे नऊ नगरसेवक निलंबित

अकोला : शहरातील मालमत्ता कराच्या थकित रकमेवर व्याज आकारणीच्या मुद्यावर ऑनलाईन सभा सुरू होण्यापूर्वी शिवसेना व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी महापौरांच्या दालनात गोंधळ घातला. ऑनलाईन सभा सुरू होऊ नये यासाठी त्यांनी उपकरणे बंद करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी महापौरांनी शिवसेना गटनेत्यासह आठ नगरसेवक व राष्ट्रवादीच्या एका नगरसेवकाला एका सभेसाठी निलंबित केले. अकोला महापालिकेची सर्वसाधारण सभा मंगळवारी सकाळी ११.३० वाजता ऑनलाईन आयोजित करण्यात आली होती. मात्र, शिवसेनेच्या नगरसेवकांनी थेट महापौरांच्या दालनात प्रवेश केला. मालमत्ता करावरील व्याज आकारणीचा मुद्दा नगरसेवकांनी रेटून धरला. सभा सुरू करण्यास नगरसेवकांनी विरोध केला. महापौर आणि आयुक्तांनी सेनेच्या नगरसेवकांना शांत राहण्याची सूचना केली. मात्र, ते ऐकत नसल्याने महापौर अर्चना मसने यांनी शिवसेनेच्या आठ नगरसेवक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक रहीम पेंटर यांना एका सभेसाठी निलंबित केले.

आपण आजपर्यंत अनेक भ्रष्टाचाराचे मुद्दे पुराव्यानिशी उघड केले. आजच्या आमसभेत कोटय़वधी रुपयांच्या एका भ्रष्टाचाराचा मुद्दा पुराव्यानिशी उघडकीस आणणार होतो. ही बाब काही अधिकाऱ्यांच्या मार्फत महापौर आणि आयुक्त यांना माहिती झाली.  त्यामुळे त्यांनी कटकारस्थान रचून आपल्याला पोलिसांच्या मदतीने आमसभेत येण्यापासून रोखले. पोलिसात तक्रार केली आहे. कारवाई न झाल्यास आंदोलन करू. – पप्पू देशमुख, गटनेते शहरविकास आघाडी महापालिकेच्या प्रवेशद्वारावर नगरसेवक निषेध नोंदवताना.