छत्रपती संभाजीनगर : बीड लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाचे बजरंग सोनवणे यांच्यात मोठी लढत पाहायला मिळणार आहे. दोन्ही नेत्यांनी मतदारसंघात प्रचाराला सुरुवात केली आहे. दरम्यान, आज (८ एप्रिल) पंकजा मुंडे यांनी बीडमध्ये प्रचारसभा घेतली. या सभेत पंकजा मुंडे यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांना आणि त्यांच्या समर्थकांना वर्गणी काढून बीडमध्ये घर बांधून देण्याचं आवाहन केलं.

पंकजा मुंडे म्हणाल्या, मी सर्वात आधी बीडमध्ये घर बांधायाला सुरुवात करणार आहे. मला तुम्ही जागा घेऊन दिली तर मी बीडमध्ये घर बांधेन, कारण माझ्याकडे पैसे नाहीत. तुम्ही सर्वांनी वर्गणी काढून जागा घेऊन दिली तर मी तिथे भूमीपूजन करेन, पहिली कुदळ मारेन आणि तुमच्याच नावावर घर बांधेन. त्यानंतर मरेपर्यंत तिथे राहीन. आपण बीडमध्ये छान घर बांधू. आष्टी, गेवराई आणि बीड मतदारसंघात कामं असतील तेव्हा मी बीडमधल्या घरात राहीन तर केज, माजलगाव आणि परळी मतदारसंघात कामं असतील तेव्हा मी परळीत मुक्काम करेन. मी सर्व कार्यकर्त्यांना शब्द देते. या घरांमध्ये राहीन आणि येथूनच तुमच्याबरोबर संपर्कात राहीन. मी सर्व कार्यकर्त्यांना शब्द देतेय, मतदारांना नाही. कार्यकर्त्यांच्या भेटीगाठींसाठी इथे राहण्याचा माझा मानस आहे.

माजी मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, मला इथल्या लोकांनी खूप माया आणि प्रेम दिलं आहे. मी देशात आणि जगाच्या पाठीवर कुठेही गेले तरी या प्रेमाची तुलना होऊ शकत नाही. कोणतीही संपत्ती या प्रेमाची बरोबरी करू शकत नाही.

हे ही वाचा >> ‘स्वाभिमानी’ कोल्हापुरात शाहू महाराजांविरोधात उमेदवार उभा करणार? राजू शेट्टी म्हणाले, “आम्ही एकूण…”

बीडमध्ये यंदा पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनावणे अशी लढत

२०१९ मध्ये भाजपाच्या प्रीतम मुंडे यांना बीडमध्ये ५०.११ टक्के मतं मिळाली होती तर बजरंग सोनवणे यांना ३७.६७ टक्के मतं मिळाली होती. २००४ मधील लोकसभा निवडणुकीचा अपवाद वगळता १९९६ पासून हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहे. तर २००४ मध्ये जयसिंग गायकवाड-पाटील या मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आले होते. १९७७ साली मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे गंगाधर अप्पा बुरांडे निवडणून आले होते. १९८९ मध्ये जनता दलाकडून बबनराव ढाकणे हेही बीडचे खासदार होते. पुढे मात्र, गोपीनाथ मुंडे यांनी हा मतदारसंघ बांधला. या मतदारसंघाचे केशरकाकू क्षीरसागर यांनी दोनदा नेतृत्व केले. यंदा भाजपाने विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांचं लोकसभेचं तिकीट कापलं आहे.