पंतप्रधान नरेंद्र मोदी काल (१५ मे) मुंबई दौऱ्यावर होते. मुंबईत २० मे रोजी पार पडणाऱ्या मतदानासाठी त्यांनी घाटकोपरमध्ये रोड शो केला. या रोड शोला मुंबईतील भाजपा कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्द प्रतिसाद दिला. पण मोदींच्या रोड शोमुळे नोकरदारवर्गाचे हाल झाले. मेट्रो सेवा खंडित झाल्याने घाटकोपर स्थानकावर चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. तर दोनच दिवसांपूर्वी झालेल्या अपघातामुळे घाटकोपरमध्येच १६ जणांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. आज त्यांनी विविध विषयांवर माध्यमांशी संवाद साधला.

“घटनाबाह्य सरकारचा जाहीरनामा कशाला पाहिजे? पैसा फेको तमाशा देखो हाच त्यांचा जाहीरनामा आहे. हेलिकॉप्टरमधून खोके पेटी उतरवायच्या, पोलिसांच्या गाड्यातून पैसे वाटायचे, लाखो मते विकत घेण्याच्या योजना करायच्या, रेटून खोटं बोलायचं हाच त्यांचा जाहीरनामा. त्यामुळे नव्याने जाहीरनामा करण्याची त्यांना गरज नाही”, अशी टीका संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केली.

हेही वाचा >> VIDEO : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत मृतांची संख्या वाढली, बचावकार्यात अडचणींचा डोंगर!

“ज्यांनी पक्ष चोरला तेच इतरांना चोर बोलत आहेत. पण चोरी झाली हे मान्य केले. चोर कोण आहे? चोराला मदत कोणी केली? चोराला मदत करणारे पंतप्रधान, गृहमंत्री, निवडणूक आयोग हे चोरांचे सरदार आहेत. म्हणून आम्हाला देशात परिवर्तन आणायचं आहे”, असंही संजय राऊत म्हणाले. तसंच, “पक्ष आम्ही सांभाळला आहे, ४ जूनला कळेल की शिवसेना, राष्ट्रवादी कोण आहे?”, असंही राऊत म्हणाले.

यासारखी अमानुष गोष्ट नाही

“देशाच्या पंतप्रधानांच्या रोड शोसाठी दुपारी १२ वाजल्यापासून मुंबईतले रस्ते, मेट्रो, रेल्वे, कार्यालये बंद केली. लोकांचे किती हाल झाले? निवडणूक आयोग आहे कुठे? आचारसंहिता आहे कुठे? अशाप्रकारे प्रचार या देशात झाला नव्हता. एका व्यक्तीने प्रचाराला यावं आणि त्याचा प्रचार सुरळीत व्हावा याकरता सर्व रस्ते बंद करण्यात आले. लोकांची गैरसोय करण्यात आली. ज्या रस्त्यावर १६ लोकांचा मृत्यू झाला तिथे पंतप्रधान रोड शो करतात. यासारखी अमानुष गोष्ट नाही. महाराष्ट्रात आणि देशात मोदींना विरोध होतोय. ४ जूननंतर भाजपाचं अस्तित्व उरणार नाही”, असं संजय राऊत म्हणाले.