दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे घाटकोपरमध्ये महाकाय फलक कोसळून पडला होता. पेट्रोल पंपावर पडलेल्या या फलकाखालून १४ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले होते. काल (१५ मे) रात्री उशिरा आणखी दोन मृतदेह बाहेर काढण्यात आल्याचे वृत्त ANI ने दिलं आहे. त्यामुळे मृतांची संख्या १६ झाली आहे. तर, दुसरीकडे गेल्या दोन दिवसांपासून प्रयत्न करूनही तो अवजड फलक काढण्यात आलेला नाही. फलक काढण्याकरता अडचणींचा डोंगर उभा राहिला असून प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

घाटकोपर पूर्व द्रुतगती मार्गावर १२०*१२० स्क्वेअरफुटाचा महाकाय जाहिरातीचा फलक लावण्यात आला होता. या जाहिरातीच्या फलकालाच्या मंजुरीवरून सध्या आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. परंतु, कोसळलेल्या या फलकाखाली अनेक गाड्या दबल्या होत्या. जवळच पेट्रोल पंप असल्याने तिथे बचावकार्यास अडचणी येत होत्या. त्यामुळे गेल्या ४८ हून अधिक तासांपासून तिथे बचावकार्य चालू आहे.

भूमिगत टाकीतील पेट्रोल निकामी करून तिथे गॅस कटरचा वापर करण्यात आला. गॅस कटरच्या सहय्याने हे होर्डिंग काढण्यात येत आहे. त्यामुळे होर्डिंगखाली दबलेल्या गाड्या बाहेर काढण्यात आले. या गाडीत दोन जणांचा मृतदेह सापडला आहे. एनडीआरएफकडून हे प्रयत्न सुरू असताना त्यांनी आधीच मृतांची संख्या वाढणार असल्याचं सूचित केलं होतं. त्यानुसार, रात्री उशिरा दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यामुळे एकूण मृतांची संख्या १६ झाली असून ७४ जण जखमी आहेत.

हेही वाचा >> घाटकोपरमध्ये लढाई अजूनही सुरूच! अजस्र फलक, अरुंद जागा, आगीची भीती, जखमींचा आकांत आणि निघून चाललेली वेळ…

राजावाडी रुग्णालयात युद्धपातळीवर व्यवस्था

घाटकोपर येथे होर्डिंग कोसळण्याच्या घटनेनंतर घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात मोठ्या रुग्णांना नेण्यात येत होते. या रुग्णांना तात्काळ तळमजल्यावर उपचार मिळावे यासाठी रुग्णालय प्रशासनाने युद्धपातळीवर त्याबाबत व्यवस्था केली. सर्व कर्मचारी एकदिलाने कामाला लागून तळमजल्यावरील एक जागा मोकळी केल्यामुळे वेगाने उपचार करणे शक्य झाल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.

फलक हटवण्यास इतका वेळ का?

ज्वलनशील पदार्थांच्या साठ्यामुळे बचाव मोहिमेत काळजीपूर्वक हाताळणी केली जात आहे. लोखंडी खांब कापताना ठिणगी उडून आगीसारखी दुर्घटना घडू नये यासाठी विशेष खबरदारी बाळगावी लागत आहे. ती घेऊनही बुधवारी सकाळी काम सुरू असताना अचानक तेथे आग लागलीच. मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच पाण्याचा मारा केल्याने ही आग तत्काळ आटोक्यात आली आणि त्यानंतर काम पुन्हा सुरू झाले. कोसळलेल्या फलकाचे सुटे भाग करण्यात आले असून या सुट्या भागांसह ढिगारा हटविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. फलकाचे चार मोठे खांब हटवल्याशिवाय मदतकार्य पूर्ण होणार नाही. त्यापैकी प्रत्येक खांब कापावा लागत आहे. एक-एक भाग कापून उचलण्यासाठी ३ ते ४ तास लागत आहे. 

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 2 more bodies have been recovered from a car stuck under the ghatkopar hoarding collapse in mumbai sgk