रविवारी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते वाराणसीत आरजे शंकरा रुग्णालयाचं उद्घाटन पार पडलं. या कार्यक्रमाला कांची कामकोटी पीठांचे शंकराचार्य शंकर विजयेंद्र सरस्वती स्वामीदेखील उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी पंतप्रधान मोदी यांचे तोंडभरून कौतुक केलं. पंतप्रधान मोदी देशातील शेवटच्या घटकांचा विचार करतात, त्यामुळे देव त्यांच्याकडून अनेक मोठी काम करवून घेत आहेत, असं ते म्हणाले. तसेच त्यांनी एनडीएचा उल्लेख ‘नरेंद्र दामोदरदास का अनुशासन’ असा केला.
नेमकं काय म्हणाले शंकर विजयेंद्र सरस्वती स्वामी?
इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, शंकराचार्य शंकर विजयेंद्र सरस्वती स्वामी यांनी त्यांच्या भाषणाची सुरुवात संस्कृतमधून केली. ते म्हणाले, “आज आपल्याला नेत्र उत्सव बघण्याची संधी मिळाली आहे. या रुग्णालयाची सुरुवात आम्ही कोयंबटूरमधून केली होती. आज देशात १७ रुग्णालये सुरू करण्यात आली आहेत. यापैकी दोन रुग्णालये उत्तर प्रदेशामध्ये आहेत. पुढे आणखी काही महत्त्वाच्या ठिकाणी ही रुग्णालये सुरु करण्याचा आमचा प्रयत्न आहे.”
“ ”पंतप्रधान मोदींसारखा नेता मिळणं आपल्या भाग्य
पुढे बोलताना त्यांनी पंतप्रधान मोदी यांचे तोंडभरून कौतुकही केलं. “ ”आज देशात मोठ्या प्रमाणात विकासकामं होत आहेत. त्याचं कारण आपल्याला पंतप्रधान मोदी यांच्या रुपाने एक कणखर नेतृत्व मिळालं आहे. पंतप्रधान मोदींसारखा नेता मिळणं हे आपल्या देशाचं भाग्य आहे. देव त्यांच्याद्वारे अनेक मोठी काम करवून घेत आहेत, असे ते म्हणाले.
“एनडीए म्हणजे नरेंद्र दामोदरदास का अनुशासन”
यावेळी बोलताना त्यांनी एनडीएचा उल्लेख ‘नरेंद्र दामोदरदास का अनुशासन’ असा केला. “एनडीएचा अर्थ नरेंद्र दामोदरदास का अनुशासन’ असा होतो. एडीएचा कारभार सुरक्षा, सुविधा आणि लोक कल्याणावर आधारीत आहे. पंतप्रधान मोदी देशातील शेवटच्या घटकांचा विचार करतात, कारण त्यांनी गरिबी बघितली आहे. त्यांना लोकांच्या दैनंदिन जीवनातील समस्यांची जान आहे, त्यामुळेच ते त्याप्रती संवेदनशील आहेत”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
हेही वाचा – DA Hike 2024: शासकीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! दिवाळीपूर्वीच सरकारची मोठी घोषणा; महागाई भत्त्यात ‘एवढी’ वाढ
पंतप्रधान मोदी म्हणाले…
दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनीही यावेळी उपस्थितांना संबोधित केलं. “पूर्वी वाराणसीला केवळ धार्मिक राजधानी म्हणून ओळखलं जात होतं. मात्र, आज वाराणसी आरोग्य सेवेसाठी ओळखली जाते. या भागातील आरोग्य सेवा आता पूर्वीपेक्षा बरीच सुधारली आहे”, असे ते म्हणाले. तसेच “मला शंकराचार्य शंकर विजयेंद्र सरस्वती स्वामीगल यांचे आशीर्वाद घेण्याचे भाग्य मिळालं, याबाबत मी स्वत:ला नशीबवान समजतो”, असेही त्यांनी सांगितलं.