तालुक्यातील अलोरे गावामध्ये बिबटय़ाचे कातडे विकण्याचा प्रयत्न करणाऱ्या चौघांना अलोरे पोलिसांनी पकडून वनविभागाच्या ताब्यात दिले. वनविभागाने चौघांविरोधात गुरुवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला. याप्रकरणी वनविभागाने गजेंद्र महादेव आटपाडकर, अजय शिंदे, प्रथमेश शिंदे व सुरेश देवरे यांना अटक केली आहे. चिपळूण तालुक्यातील अलोरे येथील रिक्षा व्यावसायिक गजेंद्र आटपाडकर याच्याकडे बिबटय़ाचे कातडे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी त्याच्या घरावर छापा टाकून ते हस्तगत केले. चौकशीमध्ये उर्वरित तिघांची नावे समोर आल्याने त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. वनविभागाच्या अखत्यारित विषय येत असल्याने पोलिसांनी याचा तपास वनविभागाकडे दिला आहे. अलोरे पोलीस स्थानकाचे साहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

या बिबटय़ाचा मृत्यू कसा झाला? त्याची शिकार कोणी केली? याची माहिती वनविभाग घेत आहेत. दरम्यान, या चौघांवर कारवाई होऊ नये यासाठी राजकीय दबाव टाकण्याचा प्रयत्नही संबंधित खात्यांवर सुरू झाला आहे.