वाई : ऑनलाइन आरक्षण करून महाबळेश्वरला पर्यटनासाठी आलेल्या एका गुजराती पर्यटक कुटुंबाला पाचगणी पोलिसांनी प्रवेश नाकारत परत पाठविले. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. मात्र काही हॉटेल व बंगलेधारक, फार्महाऊस ऑनलाइन आरक्षण घेऊन त्यांना राहण्यासाठी खोल्या उपलब्ध करून देत आहेत. त्यामुळे महाबळेश्वरकरांची चिंता वाढताना दिसत आहे.

करोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाबळेश्वर पर्यटनस्थळ पर्यटकांसाठी बंद केले आहे. तसेच शासनानेही हॉटेल, लॉज यांच्यावर वेगवेगळ्या आदेशातंर्गत निर्बंध लावले आहेत. त्यामुळे १५ मार्चपासून येथे एकही पर्यटक पर्यटनासाठी आलेला नाही. केंद्र सरकारने काही निर्बंध शिथिल केल्याचा फायदा उठवत येथील काही हॉटेल, लॉज, न्याहरी व निवास योजनेंतर्गत व्यवसाय करणाऱ्यांनी आपल्या रूम तयार करून ऑनलाइन आरक्षण सुरू केले.

यात गुजरात येथील एका पर्यटकाने ऑनलाइन सुविधेद्वारे येथील न्याहरी व निवास योजनेमधील एका लॉजमधील रूमचे दोन दिवसांचे आरक्षण केले. ठरलेल्या दिवशी ते महाबळेश्वरकडे अहमदाबादपासून पाचगणीपर्यंत आले. पाचगणी येथील सिडनी जकात नाक्यावर तपासणी पथकाने या पर्यटकांना रोखले. त्यांच्याकडील सर्व कागदपत्रांची तपासणी केली असता, त्यांनी महाबळेश्वर येथील आरक्षण दाखविले. पाचगणी व महाबळेश्वर हे पर्यटकांसाठी बंद असल्याची माहिती या तपासणी पथकाने देत या पर्यटकांच्या कुटुंबाला प्रवेश नाकारत परत पाठविले. या घटनेमुळे महाबळेश्वर येथील काहींनी आरक्षण घेण्यास सुरुवात केल्याचे निदर्शनास आल्याने पोलीस विभागाने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. विनापरवानगी आरक्षण घेतल्यास व पर्यटकांना प्रवेश दिल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.