रत्नागिरी : वाशी बाजारात कोकणातून सध्या दररोज सुमारे ९० हजार पेटी आंबा दाखल होऊ लागल्याने अपेक्षेप्रमाणे दर उतरले असून किरकोळ बाजारात चांगल्या प्रतीचा आंबा फळाच्या वजनानुसार ४०० ते ५०० रुपये डझन दराने उपलब्ध होऊ  लागला आहे. गेल्या २६ एप्रिलनंतर महाराष्ट्रासह अन्य राज्यातून वाशीच्या घाऊक बाजारपेठेत दररोज एक लाखापेक्षा जास्त आंब्याच्या पेटय़ा येण्यास सुरवात झाली. आवक वाढल्यामुळे दरही हजार रुपयांपर्यंत कमी आले आहेत.  त्यात रत्नगिरी जिल्ह्यतील आंब्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. सध्या वाशीत पाच ते आठ डझनच्या पेटीचे वजनानुसार ८०० ते २००० रुपयांपर्यंत दर  आहेत.

गेली दोन वर्षे करोनामुळे अक्षय्यतृतीयेला वाशी बाजारात एप्रिल महिन्यातील हापूसची आवक सुमारे ३० हजार पेटय़ापर्यंत मर्यादित राहिली होती. यंदा मात्र करोनाविषयक निर्बंध हटल्यामुळे बाजारात उत्साहाचे वातावरण असून आंबा बागायतदार सुखावले आहेत. फेब्रुवारी—मार्च महिन्यातील अवकाळी पावसामुळे हंगामाच्या सुरवातीला उत्पादन कमी राहिले. शिवाय, चांगला आंबा येण्यासाठी एक महिना उशीर झाला.वाशीसारख्या मोठय़ा बाजारामध्ये मार्च महिन्यात प्रतिदिनी फक्त २१ हजार पेटय़ा जात होत्या. उत्पादन कमी असल्याने सुरवातीच्या टप्प्यात पाच डझनची पेटी साडेपाच ते सहा हजार रुपयांना विकली जात होती.  त्यामुळे सर्वसामान्यांना हापूसची चव चाखायला मिळालेली नव्हती. पण या महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात उन्हाचा कडाका वाढल्यानंतर हापूसची आवक वाढू लागली. गेल्या काही दिवसात दररोज सुमारे ९० हजार पेटय़ा गेल्यामुळे दरातही मोठी घट झाली आहे.