विद्यापीठ परीक्षा केंद्रावर कॉपी करण्यास मज्जाव केला या कारणावरून एका प्राध्यापकाला मारहाण करण्याचा प्रकार इस्लामपूर येथे घडला. याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवाजी विद्यापीठाच्या बी.एससी. भाग २ च्या सध्या परीक्षा सुरू आहेत. इस्लामपूरच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात भौतिकशास्त्र या विषयाचा गुरूवारी पेपर होता. यावेळी परीक्षार्थी दर्शन पोपट पाटील याच्याकडे कॉपी आढळून आली. या वेळी असणारे वरिष्ठ पर्यवेक्षक प्रा. नितीन पाटील यांनी या परीक्षार्थीला कॉपी करण्यास मज्जाव केला. त्याची उत्तरपत्रिका व प्रवेशपत्र काढून घेत त्याला बाहेर काढले. याचवेळी अन्य ठिकाणाहूनही ८ विद्यार्थ्यांवर कॉपी प्रकरणी याच पध्दतीची कारवाई करण्यात आली.
विद्यार्थ्यांना कॉपी न करण्याचे निवेदन देण्यास प्रा. िशदे यांनी सांगितले. मात्र दर्शन पाटीलने असे लेखी देण्यास नकार दिला. या घटनेबाबत त्याने आपले मामा मानसिंग पाटील याला माहिती दिली. त्यानंतर मानसिंग पाटील व अनोळखी तरूणांनी परीक्षा केंद्रात निवेदन न देता उत्तरपत्रिका देण्यास सांगितले. मात्र प्रा. िशदे यांनी नकार देताच त्यांना शिवीगाळ करीत मारहाण केली. जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. याबाबत इस्लामपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.