वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह शनिवारी सायंकाळी झालेल्या जोरदार पावसाने नाशिक शहरासह आसपासच्या काही तालुक्यांना चांगलेच झोडपून काढले. साधारणत: तासभर चाललेल्या पावसाने शेतात उघडय़ावर ठेवलेला कांदा मोठय़ा प्रमाणात भिजल्याने शेतकरीवर्गास फटका बसला. वाऱ्यामुळे वाहिन्या तुटल्याने अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाला. सायंकाळी उशिरापर्यंत तो पूर्ववत झाला नाही. वादळी पावसाने इगतपुरी, निफाड व दिंडोरी तालुक्यात लग्न सोहळ्यात सहभागी झालेल्या वऱ्हाडी मंडळींची एकच तारांबळ उडविली.
मेच्या मध्यावर नाशिकचे तापमान ४० अंशाच्या घरात पोहोचले असल्याने गेल्या काही दिवसांपासून कमालीचा उकाडा जाणवत आहे. त्यातच काही भागांत अधूनमधून पाऊस हजेरी लावत असल्याने उकाडा कमी होण्याऐवजी वाढत आहे. शनिवारी सकाळपासून टळटळीत उन्हाबरोबर उकाडाही जाणवत होता. दुपारनंतर आकाशात ढग जमा होऊ लागले. सायंकाळी चारच्या सुमारास नाशिक शहरासह इगतपुरी, दिंडोरी, निफाड व आसपासच्या परिसरास वादळी वाऱ्यासह जोरदार पावसास सुरुवात झाली. लग्नसराई, आठवडे बाजार आणि या दिवशी लग्नांची दाट तिथ असल्याने पावसाने सर्वाची तारांबळ उडवून दिली. वादळी वाऱ्याने काही ठिकाणी लग्नाचे मंडपही कोसळले. वऱ्हाडींची एकच धावपळ झाली. घोटी बाजारातही पावसामुळे विक्रेत्यांचे नुकसान झाले. काही दुकानांमध्ये पाणी शिरले.
नाशिक शहराला जवळपास तासभर पावसाने झोडपले. या वेळी काही झाडांच्या फांद्या कोसळून वीज वाहिन्यांवर पडल्या. त्यामुळे मध्यवस्तीसह गंगापूर रोड, कॉलेज रोडसह इतर भागातील वीजपुरवठा खंडित झाला. सायंकाळी उशिरापर्यंत हे भाग अंधारात बुडाले होते. दरम्यान, निफाड व दिंडोरी तालुक्यात अचानक आलेल्या पावसामुळे खळ्यात उघडय़ावर पडलेला कांदा मोठय़ा प्रमाणात भिजला. तो  झाकण्यासाठी शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागली. त्यात जे या पद्धतीने उपाययोजना करू शकले नाहीत, त्यांच्या कांद्याचे नुकसान झाले. पावसाचा फटका आंबा पिकालाही बसणार आहे. पावसाने वातावरणातही काहीसा गारवा निर्माण झाला.