महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिन आज साजरा होत आहे. दरवर्षी वर्धापन दिनानिमित्त शिवाजी पार्कवर होणारा कार्यक्रम यंदा रद्द करण्यात आला आहे. असं असलं तरी राज ठाकरे यांनी आपल्या महाराष्ट्र सैनिकांशी संवाद साधला आहे. वर्धापन दिनाच्या निमित्ताने राज ठाकरे यांनी पक्षाच्या आजपर्यंतच्या वाटचालीला उजाळा दिला आहे. त्याचबरोबर सोबत असणाऱ्या कार्यकर्त्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. जवळपास पास मिनिटांच्या या संवादात राज ठाकरे यांनी पक्षाच्या भूतकाळाबरोबर भविष्याविषयी भाष्य करत कार्यकर्त्यांना वचनही दिलं आहे.

काय म्हणालेत राज ठाकरे?

sharad pawar devendra fadnavis (1)
“..तर त्यांनी किती कोलांटउड्या घेतल्या हे कळेल”, फडणवीसांच्या ‘त्या’ टीकेला शरद पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले…
MP Sanjay Singh says it is time to say goodbye to BJP
खासदार संजयसिंग म्हणतात, ‘भाजपला निरोप देण्याची वेळ’
MP Udayanraje Bhosale reacts on being in touch with Sharad Pawar
सातारा: तुतारीचे काय, त्या आमच्या वाड्यातही वाजतात- उदयनराजे
Tipeshwar Sanctuary
VIDEO : टिपेश्वर अभयारण्यात वाघच नाही, तर रानकुत्र्यांसह ‘या’ वन्यप्राण्यांना पर्यटकांची पसंती

माझ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना सस्नेह जय महाराष्ट्र!

आज आपल्या पक्षाचा पंधरावा वर्धापन दिन त्याबद्दल तुम्हा सर्वांना वर्धापन दिनाच्या मनापासून शुभेच्छा. बघता बघता आपण सर्वांनी एकत्र पाहिलेल्या स्वप्नाला आज १५ वर्ष पूर्ण झाली. पंधरा वर्षांपूर्वी जेव्हा आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. तेव्हा खरंच सांगतो, मनात एक धाकधूक होती. मी एका ध्येयानं बाहेर पडून महाराष्ट्रासाठी नवं असं काही उभं करायला निघालो होतो. पण तुम्ही आणि लोकं हे कसं स्वीकारतील ही धाकधूक होती. पण १९ मार्च २००६च्या शिवतीर्थावरच्या सभेत, मी व्यासपीठावर पाऊल ठेवलं… समोर पसरलेला अलोट जनसमुदाय बघितला आणि मनातील शंका दूर झाली. माझ्यासह कोणालाही हेवा वाटेल अशी महाराष्ट्र सैनिकांची अचाट शक्ती होती. या शक्तीचा माझ्यावर अढळ विश्वास आहे, याची मला खात्री पटली. गेल्या १५ वर्षात माझी महाराष्ट्र सैनिक रुपी संपत्ती, माझ्यासोबत टिकून आहे. कितीही खाचखळगे आले, अडचणींचा डोंगर उभा राहिला, तरी ते माझ्यासोबत आहेत. याच्यासारखी आनंदाची दुसरी बाब ती काय? आपल्यातले कितीजणं सोडून गेले, जाऊ द्यात. त्यांना त्यांचा निर्णय लखलाभ ठरो. पण जे माझ्यासोबत सह्याद्रीच्या कड्यासारखे टणकपणे टिकून आहेत, त्यांना मी कधीच विसरणार नाही. मी इतकंच सांगेन की मी तुम्हाला कधीही विसरणार नाही. आणि पक्षाला जे यश भविष्यात जे जे यश मिळेल त्याचे वाटेकरी तुम्हीच असाल. तुमच्याच हातून जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र मी घडवीन हे माझं तुम्हाला वचन आहे.

मी मनापासून सांगतो, तुम्ही जे पंधरा वर्षात जे करून दाखवलं ते अफाट आहे. कोणतीही धनशक्ती पाठिशी नसताना. राजकीय शक्ती पाठिशी नसताना. स्वतःचा नोकरी व्यवसाय सांभाळून तुम्ही स्वतः समाजकारण आणि राजकारणात ज्या पद्धतीने रुजवलं. ते खरंच कौतुकास्पद आहे. हजारो आंदोलनं… महाराष्ट्रभर शेकडोंनी निघालेले मोर्चे… अटकसत्र… जेलच्या वाऱ्या, हे सगळं कशासाठी तर आपल्या भाषेसाठी! आपल्या मराठी माणसांच्या हितासाठी… त्यांच्या न्याय हक्कासाठी, स्वधर्म रक्षणासाठी. या सगळ्यासाठी तुमच्याबद्दल माझ्या मनात कृतज्ञता तर आहेच आणि ती आयुष्यभर राहिल. मी खात्रीने सांगतो तुमच्याबद्दल कृतज्ञतेची भावना महाराष्ट्राच्या मनात सदैव राहिल. आपण निवडणुकीत यश पाहिलं. पराभव पाहिला आणि पराभव पचवून देखील तुमच्यातील लढण्याची उर्मी कमी झाली नाही, याचा मला खरंच अभिमान आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक घटकाला वाटतं की, आपला प्रश्न मनसेच सोडवू शकते, त्यातच भविष्यातील उष:कालाची बीजं रोवली आहेत हे विसरू नका. तुमचे श्रम, कष्ट, घाम वाया जाणार नाहीत. या सगळ्या १५ वर्षाच्या प्रवासात तुमच्या घरातल्यांनी देखील खूप सोसलंय त्याग केलाय. खूप सोसलं, मी त्यांचे मनापासून आभार मानतो. तुमच्या कुटुंबियांना सांगू इच्छितो की, आपला प्रवास खडतर आहे. पण, गरुड भरारी घेण्याची शक्ती तुमच्या सदिच्छांमुळे आणि आशीर्वादामुळे आमच्या पंखात आली आहे. त्याच्या जोरावर आम्ही सगळी आव्हान सहज पेलून पुढे जाऊ. करोनाच्या सध्याच्या परिस्थितीमुळे हा पहिलाच वर्धापन दिन आहे, ज्यामुळे आपण भेटू शकत नाही. मला कल्पना आहे, तुम्ही मला भेटायला आतूर असाल. मीही आहे. पण सध्याची परिस्थिती पाहता गर्दी टाळणं आवश्यक आहे. हे तुम्हीही मान्य कराल. तुम्हाला समोर पाहता येणार नाही, भेटता येणार नाही म्हणून हा रेकॉर्डेड संदेशाचा मार्ग स्वीकारलाय. ही परिस्थिती निवळली की मोठ्या संख्येनं भेटू हे नक्की!

तोपर्यंत स्वतःची स्वतःच्या कुटुंबियांची आणि विभागातील नागरिकांची काळजी घ्या. या वर्धापन दिनाच्या निमित्तानं १४ मार्चपासून पक्षाची सदस्य नोंदणी पुन्हा सुरू करत आहोत. सदस्य नोंदणी म्हणजे एका अर्थानं महाराष्ट्राला दिलेलं एक आश्वासन… एक वचन… व्यक्त केलेली एक बांधिलकी. याबाबतचा फॉर्म कसा भरायचा याची चित्रफीत लवकरच तुम्हाला मिळेल. त्यातील सूचना नीट ऐका. समजून घ्या. समजावून सांगा. महाराष्ट्राच्या नवनिर्माणाच्या या मंगल कार्यात सर्वांना सामावून घ्या… तुम्हाला पुन्हा एकदा वर्धापन दिनाच्या शुभेच्छा!

सदैव आपला नम्र
राज ठाकरे
जय हिंद, जय महाराष्ट्र