इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचरच्या (आययुसीएन) यादीत अतिशय धोकदायक श्रेणीत समाविष्ट असलेला रानपिंगळा महाराष्ट्रातील तानसा वन्यजीव अभयारण्यात दिसून आला. मध्य भारतातील महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या सीमेवरील सातपुडा पर्वतरांगांमध्येच आतापर्यंत या पक्ष्याचे वास्तव्य होते. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या (बीएनएचएस) पक्षीनिरीक्षकांनी प्रथमच पश्चिम घाटात त्याची नोंद केली.
बीएनएचएसने अलिकडेच केलेल्या अभ्यासात तानसा अभयारण्य पक्ष्यांसाठी अतिशय महत्त्वाचे असल्याची नोंद करण्यात आली. उत्तरेकडील पश्चिम घाटाच्या कोरडय़ा प्रदेशात आणि तत्सम प्रदेशातही त्याचे अस्तित्त्व आहे, यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. एकीकडे पश्चिम घाटात जंगलाचा ऱ्हास होत असताना या प्रदेशात अस्तित्व गमावण्याच्या मार्गावर असलेला रानपिंगळा सापडणे हे तेथील जैवविविधता अजूनही टिकून असण्याचे द्योतक आहे. ऑक्टोबरमध्ये बीएनएचएसचे माजी कर्मचारी आणि निसर्गप्रेमी सुनील लाड व त्यांच्या सहकाऱ्यांना ठिपके असलेला रानपिंगळा एका कोरडय़ा आणि पानगळ झालेल्या झाडावर दिसून आला. सर्वसाधारणपणे आढळून येणाऱ्या ठिपके असलेल्या पिंगळ्यापेक्षा तो पूर्णपणे वेगळा होता. रानपिंगळा सापडलेल्या ठिकाणापासून हे अंतर सात किलोमीटर आहे. तुकडय़ा तुकडय़ांमध्ये विभागलेले हे जंगल संपूर्णपणे कोरडे आहे. मानवी हस्तक्षेपामुळे तानस्यातील रानपिंगळ्याचे अस्तित्व आढळलेले हे क्षेत्र काही ठिकाणी मृतवत आहे. सुनील लाड आणि रोहिदास डगाळे यांनी बीएनएचएसच्या जर्नलमध्ये हा संशोधन पेपर प्रकाशित केला आहे. ुंबईजवळ अतिशय धोकादायक श्रेणीतील रानपिंगळ्याचे अस्तित्व आढळणे ही आश्चर्यकारक आणि तेवढीच महत्त्वाची बाब आहे.
गेल्या ११३ वर्षांंच्या इतिहासात रानपिंगळा धोक्याच्या श्रेणीत होता. १९९७ मध्ये महाराष्ट्रातील नंदूरबार जिल्ह्य़ातील सातपुडा पर्वतरांगांतील शहादाजवळच्या तोरणमाळच्या संरक्षित जंगलात तो दिसला. त्यानंतर गुजरातमधील पिपलाडपासूनच्या पर्वतरांगांत आणि महाराष्ट्रातील तोरणमाळ ते यावल आणि मेळघाटमध्ये तसेच मध्यप्रदेशातील कालीभीत येथे त्याचे अस्तित्व आढळले. छत्तीसगड आणि ओडिशाच्या काही भागातही त्याच्या काही प्रजाती आढळल्या. मात्र, तापी नदीच्या दक्षिण भागात त्याचे अस्तित्व दिसून आले नाही.
-डॉ. असद रहमानी संचालक, बीएनएचएस

तानस्यात आढळलेल्या रानपिंगळ्याच्या या नव्या अधिवासाच्या संवर्धनाची गरज आहे, तसेच लगतच्या इतर प्रदेशातही दुर्मीळ रानपिंगळ्याचे अस्तित्व शोधण्याची गरज आहे.
 -डॉ. गिरीश जठार, पक्षीतज्ज्ञ