वर्धा शहरातील मुथूट फिनकॉर्पच्या कार्यालयावर दिवसाढवळ्या दरोडा टाकण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. दरोडेखोरांनी साडेतीन किलो सोने लुटलं असून फरार झाले आहेत. पोलिसांनी याप्रकरणी चौकशी सुरु केली असून कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान हा सर्व प्रकार कार्यालयातील सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

सोन्यासोबत रोख रक्कमही लंपास
गुरुवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. बंदूक आणि चाकूचा धाक दाखवत दरोडेखोर कार्यालयात घुसले. सोने तारण कर्ज देणाऱ्या या कंपनीच्या कार्यालयातून घुसत त्यांनी व्यवस्थापकीय अधिकाऱ्याच्या कक्षातील चेंबरपेटी पळवली. त्यात ३ लाख १८ हजार रूपयाची रोख रक्कम व साडेतीन किलो सोने असल्याचं सांगण्यात येत आहे.

कर्मचाऱ्याची दुचाकीही पळवली
दरोडा पडत असताना सुरक्षारक्षकाव्यतीरिक्त कोणीही उपस्थित नव्हतं. दरोडा घातल्यानंतर दरोडेखोर लगेच पसार झाले. जाताना त्यांनी एका कर्मचाऱ्याची दुचाकीही चोरून नेली. दिवसाढवळ्या हा असा पहिलाच दरोडा शहरात पडल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणात चौकशी सुरू केली असून कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवले जात आहेत.