आमदार रोहित पवार यांनी गेल्या काही दिवसांपासून एमपीएससीचं पेपरफूटीचं प्रकरण लावून धरलं आहे. यावरून रोहित पवार सातत्याने राज्य सरकारवर टीका करत आहेत. तसेच विद्यार्थ्यांच्या मागण्या मांडत आहेत. तलाठी भरतीच्या शुल्कावरूनही रोहित पवार राज्य सरकारवर निशाणा साधत आहेत. याचदरम्यान, रोहित पवार यांची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या क्लिपमध्ये रोहित पवार बोलत आहेत की परीक्षा फीच्या (शुल्क) विषयात सरकार काही ऐकत नाही, त्यामुळे हा विषय थोडा पेटवत ठेवावा लागेल. यावरून सोशल मीडियावर रोहित पवार यांच्यावर टीका सुरू आहे. या टीकेला आमदार रोहित पवार यांनी उत्तर दिलं आहे.
आमदार रोहित पवार यांनी याप्रकरणी एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये रोहित पवार यांनी लिहिलं आहे की “भाजपाची ट्रोल गँग कालपासून (१८ सप्टेंबर) माझ्याविरोधात अचानक सक्रीय होऊन मला ट्रोल करण्याचा प्रयत्न करत आहे. या ट्रोल गँगचा विषय काय तर रोहित पवार राज्यातल्या युवकांना पेटवत आहे. एक महिन्यापूर्वीची फोन क्लिप व्हायरल केली जात आहे, ज्यात मी म्हणत आहे की, “परीक्षा फीच्या (शुल्क) विषयात सरकार काही ऐकत नाही त्यामुळे हा विषय थोडा पेटवत ठेवावा लागेल. त्याशिवाय हा विषय सुटणार नाही. काही लोकांना आंदोलन करायला सांगितले आहे त्याशिवाय हे सरकार सुधारणार नाही. सरकारने गाभीर्याने सांगावं यात काय चुकीचं आहे?”




रोहित पवार म्हणाले, “सरकारने परीक्षा शुल्काच्या माध्यमातून सर्वसामान्य विद्यार्थ्यांची लुटमार करायची, पेपरफुटी होत असताना दुर्लक्ष करायचं, कंत्राटीकरणाला बळ द्यायचं, युवा वर्गाच्या आयुष्याचा खेळ मांडायचा. आता या विषयांवर सत्तेच्या मस्तीत बेधुंद असलेल्या सरकारला जाब विचारून विद्यार्थ्यांची भूमिका मांडणं म्हणजे महाराष्ट्र पेटवणं असेल तर होय, मी महाराष्ट्र पेटवतोय!”
रोहित पवार राज्य सरकारला इशारा देत म्हणाले, “तुम्हाला महाराष्ट्र पेटू द्यायचा नसेल तर पेपरफूटीसंदर्भात कायदा करा, गोरगरीब विद्यार्थ्यांकडून लुटलेली परीक्षा फी परत करा, कंत्राटी भरतीचा निर्णय रद्द करा.”
हे ही वाचा >> महिला आरक्षण विधेयकाला केंद्रीय मत्रिमंडळाची मंजुरी, आज लोकसभेत मांडण्याची शक्यता
रोहित पवार यांनी म्हटलं आहे की “विद्यार्थ्यानी सरकारकडे वेळोवेळी पाठपुरावा करूनही सरकार झोपेचं सोंग घेत असेल, या सरकारपर्यंत विद्यार्थ्यांचा आवाज पोहचणार नसेल, तर या सरकारला झोपेतून जागं करण्यासाठी आम्हाला रस्त्यावर तर उतरावंच लागेल!!”