लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात १९ एप्रिल ते २० मे अशा पाच टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. त्यामुळ राज्यात महायुती व महाविकास आघाडी अशा दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगताना पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे यावेळी शिवसेना व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांचे गट सत्ताधारी व विरोधी अशा दोन्ही बाजूंना आहेत. त्यामुळे एकमेकांवर टीका-टिप्पणी सुरू असताना सध्या शिंदे गटासोबत असणारे सदा सरवणकर यांनी थेट उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याबाबत मोठं विधान केलं आहे.

दोन वर्षांपूर्वी शिवसेनेत पडलेल्या फुटीमध्ये शिंदे गट वेगळा झाला. त्यानंतर स्थापन झालेल्या सरकारमध्ये खुद्द एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले. त्यांच्यासमवेत गेलेल्या गटामध्ये सदा सरवणकर हेही आहेत. आता लोकसभा निवडणुकांच्या प्रचारसभांचा धडाका एकीकडे चालू असताना दुसरीकडे स्थानिक पातळीवर होणाऱ्या कार्यक्रमांमधूनही राजकीय टोलेबाजी केली जात असल्याचं पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर सदा सरवणकर यांनी केलेलं विधान चर्चेत आलं आहे.

काय म्हणाले सदा सरवणकर?

सदा सरवणकर यांनी मुबईत झालेल्या एका कार्यक्रमात उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याबाबत हे विधान केलं आहे. आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यासाठी रश्मी ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना अडीच वर्षं कोंडून ठेवल्याचं ते म्हणाले आहेत. तसेच, एक अतिशय विचित्र व्यक्तिमत्व, असा उल्लेख त्यांनी रश्मी ठाकरेंबाबत केला आहे.

ठाकरे गटाच्या गाण्यातील ‘या’ शब्दांवर आयोगाचा आक्षेप; उद्धव ठाकरे म्हणतात, “…तोपर्यंत आमच्यावर कारवाई करता येणार नाही!”

“एक अतिशय विचित्र व्यक्तिमत्व, जे दिसतंय खुळं, पण अतिशय कपटी. मुलाला पुढे आणण्यासाठी मातोश्रींनी केलेला अट्टाहास म्हणजे उद्धव ठाकरेंना अडीच वर्षं घरात कोंडून ठेवणं. त्यांना घरात कोंडून ठेवायचं, मुलाला थोडं पुढे आणायचं आणि मग त्याला मुख्यमंत्री करायचं हे त्यांच्यातल्या आईचं प्लॅनिंग होतं”, असा दावा सदा सरवणकर यांनी केला आहे. आता त्यांच्या या विधानावरून ठाकरे गटाकडून प्रत्युत्तर दिलं जाण्याची शक्यता आहे.