१२ आमदारांच्या नियुक्तीसंदर्भातील प्रस्तावावर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी अद्याप स्वाक्षरी केलेली नाही. त्यामुळे या आमदारांची नियुक्ती रखडली आहे. यावरून आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यपालांवर टीका केली. राज्यपालांना सही करण्याचाच प्रॉब्लेम आहे, असं राऊतांनी म्हटलंय. तसेच वर्ष उलटूनही या आमदारांची नियुक्ती का रखडली आहे, याची कारणं भाजपा नेत्यांनी आम्हाला सांगावी, असंही राऊत म्हणाले.

“राज्यपालांना सही करण्याचा प्रॉब्लेम आहे, मात्र नेमका काय प्रॉब्लेम आहे, ते माहित नाही. खरंतर राज्यपालांनी महाराष्ट्र मंत्रिमंडळानं केलेल्या शिफारसी स्वीकारणं त्यांच्यावर बंधनकारक असतं, ते त्यांचं कर्तव्य आहे. हे महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांना कुणीतरी समजावून सांगायला पाहिजे. ते फक्त घटनेचा हवाला देतात. मात्र, राज्यपालांनी आमच्या १२ आमदारांची नियुक्ती का रखडवली आहे, याचं कारण भाजपाच्या लोकांनी आम्हाला सांगावं. त्यांनी आमची शाळा घ्यावी आणि आम्हाला स्पष्ट सांगावं.” असं राऊत म्हणाले. तसेच तुम्ही कुणाला प्रत्येक गोष्टीत आम्हाला राज्यघटना काय शिकवताय असं म्हणत तुम्ही या देशाची दुर्घटना केली आहे, अशी टीकाही राऊत यांनी भाजपावर केली. आमची आंबेडकरांची भूमी आहे. आमच्यापेक्षा जास्त कोणीच राज्यघटनेचं पालन करत नाही, असंही राऊत म्हणाले. राऊतांनी एबीपी माझाशी बोलताना राज्यपाल कोश्यारी आणि भाजपावर टीका केली.

अलिकडच्या काळात अनेक ठिकाणी राज्यपाल आपल्या पदाचं अवमुल्यन करताना दिसून येतात. राज्यपाल हे पांढरे हत्ती झाल्याचंही राऊत म्हणाले. यावेळी त्यांनी मुंद्रा बंदरावर सापडलेल्या हेरॉईन संदर्भात टीका केली. २ ग्राम हेरॉईन सापडल्यानंतर गोंधळ घालणारे गुजरातमधील ९ हजार कोटींच्या हेरॉईनबाबत गप्प का बसले आहेत, असा सवाल राऊतांनी केला. तसेच या अमली पदार्थांशी अफगाणिस्तानचा थेट संबंध असून यामागे तालिबानचा हात आहे, असंही ते म्हणाले.