देशात सर्वच पक्षांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. भारतीय जनता पार्टी प्रचारात सर्वात आघाडीवर आहे. भाजपाचे स्टार प्रचारक पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील भाजपाचा प्रचार करू लागले आहेत. रविवारी (३१ मार्च) मोदी यांनी मेरठ येथे जाहीर सभा घेतली. या सभेत त्यांनी विरोधी पक्षांवर हल्लाबोल केला. तसेच त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. या भ्रष्टाचाऱ्यांना आम्ही सोडणार नाही असं वक्तव्यदेखील मोदी यांनी केलं. मोदींच्या या वक्तव्यावर शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी पलटवार केला आहे. संजय राऊत यांनी मोदींचं हे वक्तव्य म्हणजे विनोद असल्याचं म्हटलं आहे. तसेच राऊत यांनी मोदींची विनोदी अभिनेता जॉनी लीवरशी तुलना केली आहे.

संजय राऊत यांनी काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी मेरठ येथील भाजपाच्या जाहीर सभेत म्हणाले, भ्रष्टाचाऱ्यांना आम्ही सोडणार नाही. मोदींनी हा सर्वात मोठा जोक केला आहे. ते दररोज असा एक विनोद करत आहेत. त्यांचे विनोद ऐकले की वाटतं, देशात जॉनी लीवरनंतर (बॉलिवूडमधील प्रसिद्ध विनोदी अभिनेता) कोणी मोठा विनोदी कलाकार असेल तर ते मोदी आहेत. हा गुजरातचा लीवर आहे, जो आमचं मनोरंजन करतोय.

संजय राऊत म्हणाले, एक गंमत बघा, मोदी जेव्हा म्हणाले आम्ही भ्रष्टाचाऱ्यांना सोडणार नाही, तेव्हा त्यांच्या आजूबाजूला १० भ्रष्टाचारी बसले होते. दुसऱ्या बाजूला त्यांच्या पक्षात दररोज सरासरी ५ भ्रष्टाचारी नते प्रवेश करत आहेत. हे साधेसुधे भ्रष्टाचारी नाही, कुख्यात भ्रष्टाचारी आहेत. एखादा कुख्यात गुंड असतो तसेच हे कुख्यात भ्रष्टाचारी आहेत. तुम्ही त्यांचं काय करणार? हे कुख्यात भ्रष्टाचारी तुमच्या शेजारी बसतील, तुमच्याबरोबर देशभर फिरतील, तुमच्या सरकारमध्ये सहभागी होतील. तुम्ही त्यांच्या गुन्ह्यांच्या पोलीस ठाण्यातील फाईल्स बंद कराल आणि आम्हाला अक्कल शिकवाल. खरंतर, भाजपा सर्वात मोठी भ्रष्टाचारी आहे.

हे ही वाचा >> नाशिकमधून लढणार का? छगन भुजबळ म्हणाले, “लोकसभेचं तिकिट..”

शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार म्हणाले, नरेंद्र मोदी अद्याप निवडणूक रोख्यांच्या घोटाळ्याबाबत बोलले नाहीत. ते नेमका कोणता भ्रष्टाचार संपवणार आहेत? त्याबद्दल बोलले नाहीत. मी मोदींना आणि त्यांच्या पक्षाला आव्हान देतो की, हिंमत असेल तर निवडणूक रोख्यांच्या प्रकरणावर मोदींनी किंवा भाजपाने भाष्य करावं. निवडणूक रोख्यांचा घोटाळा हा भाजपाने केलेला भ्रष्टाचार आहे की नाही ते सांगावं. भाजपाने जगाला मुर्ख बनवण्याची कामं बंद करावी.