औरंगाबाद शहरातील शताब्दीनगर येथील मुलं आठ ते दहा वर्षांपासून समाज मंदिराच्या खोलीत शिकत होते. बालवाडी ते चौथीपर्यंतची शाळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात भरत होती. मात्र नागरिकांच्या विरोधामुळे बाबासाहेबांच्या नावाने असलेला तो निवाराही गेला असून उघड्यावर शाळा भरवावी लागली. लहान मुलं, शिक्षिका चप्पल घालून समाज मंदिरात जात असल्याचं सांगत काही नागरिकांनी शाळा बंद करायला लावली. त्यामुळे दोन दिवसांपासून मोकळ्या जागेत वर्ग भरत आहेत.

पालिकेने इमारतीची सोय केली नाही त्यामुळे गेल्या सात ते आठ वर्षांपासून समाज मंदिरात शाळा भरत असल्याचं शिक्षिका शमीना शेख यांनी सांगितलं. बालवाडी ते चौथी असे वर्ग असून ११४ एवढी पटसंख्या आहे. तर पाच शिक्षक आणि एक सेवक असे सहा कर्मचारी याठिकाणी काम करतात. एका खोलीत चार वर्ग भरवले जात होते. मात्र आता ते बंद करण्याची मागणी होत असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे उघड्यावर शाळा भरवावी लागली होती. त्याच भागात राहणाऱ्या रुक्साना बेगम आणि इतर महिला यांनी मुलांना हक्काची शाळा मिळावी अशी मागणी केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणासाठी चळवळ चालवली. त्यांच्या नावाने असलेल्या सभागृहात मुलांना बसू द्यायला हवं. पालिकेने इतर जागेची सोय करेपर्यंत वर्ग सभागृहात भरू द्यावेत असं मारुती तुपे यांचं म्हणणं आहे. तर त्याठिकाणी असलेले भंते कीर्तीजोती यांचं म्हणणं आहे की, सभागृहात बुद्धमुर्ती आहे. त्या ठिकाणी चप्पल घालून मुलं, शिक्षिका येतात. त्यामुळे आमच्या भावना दुखावत आहेत. म्हणून वर्ग भरू देण्यास विरोध केल्याचं त्यांनी सांगितलं. बाबासाहेबानी शिक्षणाची मोहीम सुरु केली. मात्र एका खोलीत चार वर्ग कसे घेतले जाऊ शकतात. मुलांना काय गुणवत्तेचं शिक्षण मिळणार. त्यामुळे इतर ठिकाणी सोय करायला हवी असं मत त्यांनी मांडलं.

महापौर नंदकुमार घोडले यांना यासंदर्भात विचारलं असता, शताब्दी नगरपासून जवळ आठशे मीटरवर पालिकेची दुसरी शाळा आहे. मात्र त्याठिकाणी जाण्यासाठी रस्ता ओलांडून जावं लागत होतं. रस्ता ओलांडताना अपघात घडल्याने शाळा शताब्दीनगर येथील सभागृहात भरवण्यात येत होती. मात्र समाजमंदिरात मुलं चप्पल घालून बसतात असं नागरिकांच म्हणणं आहे. त्यामुळे त्यांच्या भावना दुखावल्या जात आहेत. त्यामुळे पालिकेकडून तात्काळ पर्यायी सोय करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुलांना शिक्षण मिळायला हवं. यासाठी पालिका लवकरात लवकर पर्यायी जागेची सोय करेल असं घोडेले यांनी सांगितलं.