अत्यल्प पावसामुळे रखडलेल्या रब्बी पेरण्या अवकाळी पावसाने दमदार बरसात करताच सुरू झाल्या आहेत. या पावसामुळे रब्बी हंगामाला अनुकूल वातावरण तयार झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
शनिवारी सायंकाळपासून जिल्हाभर चांगला पाऊस झाला. सोमवारपासून शेतकऱ्यांनी चाढय़ावर मूठ धरण्यास प्रारंभ केला. जिल्हय़ात रब्बीचे क्षेत्र मोठे आहे. गहू, ज्वारी पिकांना पाऊस लागतो. पाऊस नसल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरा केलाच नव्हता. रब्बीला आता उशीर झाल्यामुळे हरभरा व करडई ही दोन पिकेच येऊ शकतात. रब्बी पेऱ्यासाठी दुकानातील हरभऱ्याचे बियाणे विक्रीविना पडून होते. सोमवारी बाजारपेठेला झळाळी आली अन् शेतकऱ्यांनी बियाण्यांसाठी गर्दी केली.
रविवारी सकाळी आठपर्यंत लातूर तालुक्यात सर्वाधिक २७.६२ मिमी पाऊस पडला. निलंगा २५.६३, औसा १७.७१, शिरूर अनंतपाळ  १८.३३, रेणापूर १२.२५, चाकूर १२.८, जळकोट ८, देवणी ५, अहमदपूर ३.१६, उदगीर निरंक, सरासरी १३.०५ मिमी याप्रमाणे पावसाची नोंद झाली. हवामान विभागाने पुन्हा पावसाची शक्यता वर्तविली. मात्र, गेले दोन दिवस आभाळ कोरडेच राहिले. उदगीर वगळता उर्वरित तालुक्यांत पेरणीस प्रारंभ झाला. पावसामुळे जनावरांसाठी नव्याने गवत उगवेल. असाच अवकाळी पाऊस पुढील महिन्यात झाल्यास रब्बीची पिके चांगली येतील, असा शेतकऱ्यांचा अंदाज आहे.