अवघ्या जगभरासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या करोना लस संशोधन अभ्यास प्रकल्पासाठी कृष्णा हॉस्पिटलची निवड झाल्याने, कराडचे नाव जगाच्या नकाशावर झळकणार असल्याची माहिती कृष्णा विश्वस्त न्यासाचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांनी दिली.

डॉ. भोसले म्हणाले, की जगभर थैमान घालणाऱ्या करोना विषाणूवर पुण्यातील जगप्रसिद्ध सीरम इन्स्टिटय़ूटने प्रतिबंधक लस विकसित केली असून, या लसीच्या वैद्यकीय चाचण्यांना देशभरात लवकरच सुरुवात होईल. या वैद्यकीय चाचण्यांसाठी निवड करण्यात आलेल्या भारतातील ४० वैद्यकीय संशोधन केंद्रांमध्ये कराडच्या कृष्णा हॉस्पिटलचा समावेश आहे.

धनुर्वात, गोवर, डेंग्यू यांसारख्या आजारांवरील लस शोधणाऱ्या पुण्यातील जगप्रसिद्ध सीरम इन्स्टिटय़ूटने अमेरिकन बायोटेक्नॉलॉजी कंपनी ‘कोडाजेनिक्स’च्या मदतीने फेब्रुवारी महिन्यातच करोनावर मात करणारी लस विकसित करण्यास प्रारंभ केला होता. या लसीच्या वैद्यकीय चाचण्यांसाठी ‘ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया’ची मान्यता मिळाली होती. देशातील ४० निवडक संस्थांमध्ये होणाऱ्या या वैद्यकीय चाचण्यांसाठी गोव्याच्या प्रसिद्ध ‘सीआरओएम क्लिनिकल रिसर्च अ‍ॅन्ड मेडिकल टुरिझम’ या एनएबीएच मान्यताप्राप्त संस्थेचे सहकार्य लाभणार आहे. अत्याधुनिक सुविधा, सुसज्ज पायाभूत सुविधा, तज्ज्ञ सेवावर्ग, वैद्यकीय संशोधनाचा दीर्घ अनुभव या निकषांच्या आधारे कृष्णा हॉस्पिटलची या महत्त्वपूर्ण संशोधन अभ्यास प्रकल्पासाठी निवड करण्यात आली. कृष्णा हॉस्पिटलमधील तज्ज्ञ संशोधक डॉक्टर्स या संशोधन कार्यात योगदान देण्यासाठी सज्ज झाल्याचा विश्वास डॉ. भोसले यांनी या वेळी दिला.

या चाचण्यांमध्ये पहिल्या टप्प्यात समाजातील उच्च जोखीम गटात मोडणाऱ्या, जसे की आरोग्य कर्मचारी, पोलीस, सुरक्षारक्षक, भाजीपाला व फळ विक्रेते, किराणामाल विक्रेते यांचा अभ्यास केला जाईल. ‘कृष्णा’मधील डॉ. सुजाता पाटील, डॉ. अपर्णा पतंगे व डॉ. सुजाता जाधव या प्रकल्पाच्या समन्वयक म्हणून काम पाहतील. ‘सी.आर.ओ.एम.’चे संचालक डॉ. धनंजय लाड आणि डॉ. विजयकुमार पाटील हे सीरम इन्स्टिटय़ूटच्या वतीने प्रकल्पाचे निरीक्षक असतील. करोना संसर्गाचे संक्रमण रोखण्यासाठी या लसीचा मोठा उपयोग होणार आहे. वैद्यकीय चाचण्यांच्या यशस्वीतेनंतर ही लस लवकरच सामान्य लोकांसाठीही उपलब्ध करून देण्याचा सीरम इन्स्टिटय़ूटचा मनोदय असल्याचे डॉ. भोसले यांनी सांगितले.