खासदार धैर्यशील माने यांच्या घरावर शिवैनिकांनी मोर्चा काढल्यानंतर आज शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन शिवसैनिकांवर टीका केली आहे. खासदारांच्या घरावर मोर्चा काढायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला, असा संतप्त सवाल त्यांनी शिवसैनिकांना विचारला आहे. तसेच तुमच्या भावना भडकवल्या जात आहे, याचा तुम्ही विचार करावा, असेही आवाहनही त्यांनी यावेळी शिवसैनिकांना केले आहे. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांनाही काही प्रश्न विचारले आहेत.

काय म्हणाले दिपक केसरकर?

आमच्या खासदारांच्या घरावर शिवसैनिक मोर्चे निघत आहेत. त्यांच्या घरावर मोर्चा काढण्याचा अधिकार शिवसैनिकांना कोणी दिला? असे मोर्चे काढणं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांनी लक्षात घेतलं पाहिजे. आज तुमच्या भावना भडकावल्या जात आहे, त्याचा विचार करा, असे आवाहन त्यांनी शिवसैनिकांना केले.

हेही वाचा – उत्तर प्रदेशात सामूहिक बलात्कार प्रकरण ; माजी आमदाराच्या मुलाला पुण्यातून अटक

”उद्धव ठाकरेंनी उत्तरं द्यावी”

”एकनाथ शिंदेंनी मला मुख्यमंत्री पद नको, मात्र तुम्ही भाजपासोबत युती करा, अशी विनंती केली होती, हे खरे का? असा प्रश्न केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांना विचारला. तसेच खासदार राहुल शेवाळेंनी सांगितल्याप्रमाणे उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांच्यात युतीची बोलणी सुरू होती. मात्र, १२ आमदारांचे निलंबन केल्याने ही चर्चा फिसकटली, हे खरं आहे का? एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवण्याचे आश्वासन बाळासाहेब ठाकरे यांनी दिले होते. मात्र, ते स्वत: तुमच्याकडे येऊन आम्हाला हिंदुत्त्व सोबत जायचं आहे, असं म्हणाले होते. तेव्हा तुम्ही हिंदुत्त्वाबरोबर का गेला नाही, हे देखील उद्धव ठाकरेंनी सांगावं, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – मंत्रिमंडळ विस्तारावरून अजित पवारांची शिंदे-फडणवीस सरकारवर टीका; म्हणाले, “राज्यात बहुमताचे सरकार…”

नाव न घेता संजय राऊत, आदित्य ठाकरेंवर टीका

गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या प्रवक्त्याच्या स्वभावात सुधारणा होती. मात्र, तो पुन्हा बिघडत चालला आहे, अशी टीका त्यांनी नाव न घेता संजय राऊतांवर केली. २०१४ साली राज्यात भाजपासोबत सत्तेत असताना, रोज सकाळी कोणतरी पत्रकार परिषद घ्यायंच आणि केंद्र सरकारवर टीका करायचे, हे योग्य नव्हतं. तुम्ही ज्या पक्षासोबत सत्तेत आहात निदान त्यांच्याशीतरी संबंध चांगले ठेवायचे, असेही केसरकर म्हणाले. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरेंवरही नाव न घेता टीका केली. ”युवासेनेचे प्रमुख आज मुंबईत फिरत आहेत. अनेक शाखांना भेटी देत आहेत. मात्र, कालपर्यंत हे मुंबईतही दिसत नव्हते”, असे केसरकर म्हणाले.