विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल लागल्यापासून काही ठिकाणी जल्लोष तर काही ठिकाणी कार्यकर्ते निराश झाल्याचे चित्र दिसत आहे. आपला लाडका नेता निवडून यावा यासाठी दिवसरात्र मेहनत घेणाऱ्या कार्यकर्तांचे अनेक नेत्यांनी आभार मानले आहेत. अनेक कार्यकर्ते मागील दोन अडीच महिन्यापासून राजकीय प्रचाराच्या कामात अडकेलेल होते. आता मात्र निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर त्यांना उसंत मिळाली आहे. पण सोलापूरमधील एका कार्यकर्त्याने निवडणुकीच्या निकालानंतर चक्क १८ किलोमीटरचे अंतर दंडवत घातल पार केले आहे. हे असं करण्यामागील कारणं म्हणजे त्याचा लाडका नेता निवडून यावा म्हणून त्याने केलेले नवस.

१८ किलोमीटरपर्यंत दंडवत घालून नवस फेडणाऱ्या या कार्यकर्त्याचे नाव आहे बापू जावीर. जावीर हा सांगोला मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार शहाजी बापू पाटील यांचा समर्थक आहे. सुपाली गावातील रहिवाशी असणाऱ्या जावीर याने पाटील विजयी व्हावेत म्हणून नवस केला होता. जावीरने केलेल्या नवसाची पंचक्रोषीत चर्चा होती. “सांगोल्यात अत्यंत चुरशीची लढत आहे. यामध्ये शिवसेनेच्या पाटील यांचा विजय होऊ दे. त्यांचा विजय झाला तर मी माझ्या सुपली गावातून विठ्ठल रुक्मिणी मंदिरापर्यंत दंडवत घालत येईन,” असा नवस जावीर बोलला होता. मतमोजणीच्या दिवशी पाटील हे सांगोल्यातून केवळ ६७४ मतांच्या फरकाने जिंकून आले.

पाटील यांच्या या विजयानंतर जावीरने खरोखरच आपला नवस पूर्ण केला. भर उन्हामध्ये जावीरने त्याच्या गावापासून विठ्ठल रुक्मिणी मंदिरापर्यंत दंडवत घालत नवस पूर्ण गेला. जावीरचे डांबरी रस्त्यावर दंडवत घालत असतानाचे व्हिडिओ स्थानिकांनी व्हायरल केले आहेत. अनेकांनी जावीरचे कौतुक केले असून असा कार्यकर्ता असणारे पाटील हे नशिबवान असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.