शेतकरी आंदोलनावरुन माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर टीका आहे. मात्र दुसरीकडे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मात्र राजकीय मतभेद बाजूला ठेवून विचार केला तर फडणवीसदेखील आंदोलनाला पाठिंबा देतील असं म्हटलं आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीची भूमिका दुटप्पी असल्याची टीका केली आहे असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “आता हे उत्खनन करायचं म्हटलं तर खूप लांबपर्यंत जाईल. आज देशात काय सुरु आहे. १० वर्षापूर्वीचं बोलू नका. शेतकरी आज रस्त्यावर आहे, त्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस किंवा तृणमूल काँग्रेसने आवाहन केलेलं नाही. जो शेतकरी रस्त्यावर उतरला आहे त्याला कोणतंही राजकीय पाठबळ नाही हे महाराष्ट्राच्या विरोधी पक्षनेत्याने समजून घेतलं पाहिजे. त्याच्या हातात कोणताही राजकीय झेंडा नाही. त्यामुळे आपण विरोधी पक्षनेते म्हणून आपण काय भूमिका मांडत आहोत याचा त्यांनी विचार केला पाहिजे”.

आणखी वाचा- Bharat Bandh: संजय राऊतांचं थेट नरेंद्र मोदी, अमित शाह यांना आव्हान, म्हणाले…

“आज शेतकरी रस्त्यावर आहे, आज तो स्वत:च्या छातीवर गोळ्या झेलण्यास का तयार झाला आहे याचा राजकीय मतभेद बाजूला ठेवून शांत डोक्याने विचार केला तर देवेंद्र फडणवीस सुद्धा शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहतील याची खात्री आहे,” असा विश्वास संजय राऊत यांनी यावेळी व्यक्त केला.

आणखी वाचा- तोडगा काढण्याऐवजी ‘ते’ नक्की शेतकरी आहेत का असं विचारता; उर्मिला मातोंडकरांचा संतप्त सवाल

“दबावात येण्याची गरज नाही. सरकारकडे डोकं नाही पण जर त्यांनी मनाने विचार केला तर पंतप्रधान किंवा गृहमंत्री शेतकऱ्याशी जाऊन चर्चा करतील. शेतकऱ्याचं ऐकलं तर संपूर्ण जग आपलं ऐकेल,” असंही ते म्हणाले आहेत. लोकांचा पाठिंबा शेतकऱ्यांना मिळत आहे असंही यावेळी त्यांनी सांगितलं.

आणखी वाचा- #BharatBandh: दुटप्पी असल्याच्या फडणवीसांच्या टीकेला संजय राऊतांनी दिलं उत्तर, म्हणाले…

“मी संपूर्ण देशातून माहिती घेत होतो. जिथे भाजपाचं सरकार आहे तिथेही चांगल्या प्रकारे बंदला प्रतिसाद मिळत आहे. कारण हा बंद राजकीय नाही तर भावनांना पाठिंबा देण्यासाठी आहे. तो स्वच्छेने, स्वंयफूर्तीने ज्याच्या कष्टाचं अन्न आपण खात आहोत त्याच्यासाठी आहे. जो शेतकरी, कष्टकरी शेतावर राबत आहे त्याचे काही प्रश्न आहेत. त्याच्याबद्दल काही मतभेद असू शकतील. पण गेले १२ दिवस थंडी, वाऱ्याची, सरकारी दडपशाहीची पर्वा न करता दिल्लीच्या सीमेवर संघर्ष करतोय त्याला पाठिंबा देणं हे देशातील नाही तर जगातील प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. जगात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना समर्थन देण्यासाठी मोर्चे निघाले आहेत,” असं संजय राऊत यांनी यावेळी सांगितलं.