मोदी सरकारने केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी आवाज उठवला आहे. आज देशभरात भारत बंद पाळला जात असून, त्याचे पडसादही ठिकठिकाणी दिसून येत आहेत. शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनावर भूमिका मांडताना अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. उर्मिला मातोंडकर यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेनेत प्रवेश केला असून, त्यांनी पहिल्यांदाच शेतकरी आंदोलनाविषयी भाष्य केलं आहे.

उर्मिला मातोंडकर यांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीत  दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावरून मोदी सरकारवर असंवदेनशील असल्याचा आरोप केला आहे. “शेतकऱ्यांना आज इतका मोठा संघर्ष करावा लागत आहे, ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. शेतकरी घरदार सोडून आबालवृध्दासह रस्त्यावर उतरले आहेत. थंडीत रस्त्यावर ठिय्या मारून बसले आहेत. त्यावरून शेतकऱ्यांच्या भावना किती तीव्र आहेत हे लक्षात येईल. सर्व गोष्टी बाजूला ठेवून त्यांचे म्हणणे ऐकून घेणे गरजेचे आहे, त्याउलट ते नक्की शेतकरी आहेत का? यापासून त्यांचे कपडे, त्यांच्या वस्तूंचे ब्रँड, ते इंग्रजी कसे बोलतात? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पण आता तरी केंद्र सरकारने शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून त्यावर समाधानकारक तोडगा काढणे अत्यंत आवश्यक आहे आणि त्यावर लवकर तोडगा निघेल अशी अपेक्षा,” असं म्हणत उर्मिला मातोंडकर यांनी मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे.

आणखी वाचा- Bharat Bandh: संजय राऊतांचं थेट नरेंद्र मोदी, अमित शाह यांना आव्हान, म्हणाले…

“कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर देशातील शेतकरी भर थंडीत संघर्ष करीत आहेत. केंद्र सरकार शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून तर घेत नाहीच, पण त्यांच्यावर थंड पाण्याचा मारा करीत आहे. ज्या देशातील शेतकरी दुःखी असतो तो देश कधीच प्रगती करीत नाही. कृषीप्रधान देश असलेल्या या देशातील शेतकऱ्यांच्या बाबतीत केंद्रातील सरकार अतिशय असंवेदनशील आहे,” अशी टीकाही अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी केली.