शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेतली. आज राऊत यांचा वाढदिवस असल्याने अनेक पत्रकारांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच एका पत्रकाराने त्यांना यंदाच्या वाढदिवसाला महाराष्ट्रातील सत्तेचा केक काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर कसा खाणार? अशा पद्धतीचा सवाल विचारला. यावर संजय राऊत यांनी महाराष्ट्र काही केक नाही असं उत्तर दिलं.

राज्यामधील विधानसभेचे निकाल लागल्यापासून सातत्याने शिवसेनेची भूमिका प्रसारमाध्यमांसमोर मांडणाऱ्या संजय राऊत यांचा आज ५८ वा वाढदिवस आहे. मात्र वाढदिवसाच्या दिवशीही त्यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सत्ता स्थापनचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती दिली. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांना प्रश्न विचारताना एका पत्रकाराने वाढदिवसाच्या शुभेच्छा देत ‘यंदाच्या वाढदिवसाला तुमच्याबरोबर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आहे. तर आता सत्तेचा केक तिघे मिळून कसा खाणार?,’ असा प्रश्न विचारला. या प्रश्नाला राऊत यांनी थोडं चिडूनच उत्तर देताना महाराष्ट्र काही केक नाही असं स्पष्ट केलं.

“महाराष्ट्र काही केक नाहीय. या राज्याच्या निर्मितीमध्ये महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे मोठे योगदान राहिले आहे. काँग्रेसच्या अनेक नेत्यांच्या राज्याच्या कामगिरीमध्ये योगदान सुरुवातीपासूनच आहे. महाराष्ट्रातील काही काँग्रेसचे नेते हे भारताच्या स्वातंत्रसंग्रामामधील आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चवळवळीतील मोठे नेते आहेत हे मी आज नाही अनेकदा बोलतो. वसंतदादा पाटील असो किंवा किसनवीर असो काँग्रेसचे अनेक नेत्यांचे कार्य मोठे होते. त्यामुळे हे केक कापण्याचं राहून द्या. महाष्ट्राच्या निर्मितीमध्ये आणि प्रगतीपथावर पुढे घेऊन जाण्यामध्ये ज्या नेत्यांचा वाट आहे ते सर्व सत्ताधारी सर्वच पक्षांचे नेते आहेत,” असं राऊत या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले.

“महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही एकसूत्री कार्यक्रम ठरवला आहे. सत्तेचा फॉर्म्युला शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेच ठरवतील,” असंही त्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये नमूद केलं. “यापूर्वी भिन्न विचारधारांचे लोक एकत्र येऊन सरकार स्थापन केलं होते. त्यानंतरही राज्याचा कारभार सुरळीत सुरू होता. गेले अनेक वर्ष उद्धव ठाकरे शेतकऱ्यांचे प्रश्न मांडत आहेत. काही पक्ष एकत्र येऊन जर शेतकऱ्यांचे प्रश्न मांडत असतील तर त्यात त्यांचच भलं आहे,” असंही ते म्हणाले.