राज्यातील सत्तापेचावर सर्वोच्च न्यायालय निर्णय देणार असताना शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीने सोमवारी शक्तिपरीक्षेची रंगीत तालीम घेतली. या तिन्ही पक्षांनी १६२ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र राज्यपालांना सादर केले. त्यानंतर आमदारांना सायंकाळी ग्रँड हयात या पंचतारांकित हॉटेलात एकजुटीची शपथ देण्यात आली. दरम्यान शिवसेना नेते संजय राऊत यांनी एक सूचक ट्विट केलं आहे. संजय राऊत यांनी ट्विटमध्ये, “१६२ आणि अधिक…वेट अ‍ॅण्ड वॉच” असं म्हटलं आहे.

नारायण राणे यांनी मात्र ग्रँड हयात हॉटेलमध्ये फक्त १३० आमदार होते असा दावा केला आहे. त्यांच्या हातात आमदारच नाहीत, असाही आरोप नारायण राणेंनी केला. ग्रँड हयात या हॉटेलमध्ये १६० आमदार नव्हते तर १३० आमदारच उपस्थित होते, जे आमदार आले नाहीत त्यातला सगळ्यात मोठा खड्डा शिवसेनेला पडला आहे. अनेक आमदार विधान परिषदेचे होते असंही नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

अजित पवारांना पक्षादेशाचा अधिकार नाही : शरद पवार
अजित पवारांचा आदेश न मानल्यास अपात्रतेची कारवाई होईल, अशी भीती नवीन आमदारांना दाखवली जात आहे. पण ते चुकीचे आहे. राष्ट्रवादीने अजित पवार यांना गटनेतेपदावरून दूर केले आहे. त्यामुळे आता अजित पवार यांना पक्षादेश काढण्याचा अधिकारच उरलेला नाही, असे राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी आमदारांना मार्गदर्शन करताना स्पष्ट केले. अजित पवार यांनी पक्षादेश काढलाच तर त्यांच्याविरोधात मतदान करणाऱ्यांवर कसलीही कारवाई होणार नाही, अशी ग्वाही पवार यांनी दिली.

हा पोरखेळ : शेलार
“शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा हा कार्यक्रम म्हणजे एक पोरखेळ होता. ओळख परेड ही गर्दीतून आरोपी ओळख पटविण्यासाठी होते. जनतेतून निवडून आलेल्या आपल्या आमदारांचा अपमान केलाच, पण निवडून देणाऱ्या जनतेचाही अपमान करण्यात आला आहे. आत्मविश्वास गमावल्यानंतर आत्मबळ मिळवण्याचा नेत्यांनी केलेला हा टुकार प्रयत्न आहे. आज १६२ आमदार असल्याचा कांगावा केला, पण विधानसभेचे १४५ तरी आमदार होते का? याचे उत्तर त्यांनी द्यावे,” असे आव्हान भाजप नेते आशीष शेलार यांनी दिलं आहे. “महाराष्ट्रातील तमाम मराठी माणसाने शरमेने मान खाली घालावी असा एक प्रसंग देशाने पाहिला आणि तो म्हणजे वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आमदार आदित्य ठाकरे यांनी चक्क सोनिया गांधी यांचे नेतृत्व मान्य केल्याची शपथ घेतली. सत्तेसाठी शिवसेना काय करू शकते हे देशाने पाहिले आणि शिवसेनेचे बेगडी हिंदुत्वही समोर आले आहे. फोटो तुमचा, फोटोग्राफर तुमचा, पण बहुमताच्या शर्यतीत फोटोफिनिश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारच करणार,” असे शेलार म्हणाले.