सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात अग्निप्रलयाच्या घटना घडत असूनही अग्निशमक दल सज्ज नाही. जिल्ह्य़ातील चार नगर परिषदांचे अग्निशमक दल आहे. पण सिंधुदुर्ग डोंगरदऱ्यांचा असल्याने नगर परिषद कार्यक्षेत्राबाहेर अग्निप्रलयाच्या घटना घडताना हे दल मदतीसाठी धावते, पण त्याच वेळी नगर परिषद कार्यक्षेत्रात दुर्दैवी घटना घडली तर काय करावे असा प्रश्न नगर परिषदांना पडला आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा डोंगराळ आहे. या जिल्ह्य़ात एका बाजूला पश्चिम अर्थात सह्य़ाद्री घाट व दुसऱ्या बाजूला विस्तीर्ण सागरकिनारा आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्य़ासाठी खास अग्निशमक व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कार्यरत असावी असे जनतेला वाटते. तसेच सिंधुदुर्ग गोवा व कर्नाटक राज्याच्या सीमेवर आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात सावंतवाडी, वेंगुर्ले, कणकवली व मालवण या नगर परिषदा आहेत. या नगर परिषदांत अग्निशमक दल आहे. मात्र कुडाळ, दोडामार्ग, वैभववाडी, देवगड हे तालुके एकमेकांच्या अंतरापासून दूरच आहेत. कुडाळ तालुक्यात सिंधुदुर्ग शासकीय मुख्यालय आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा डोंगर दऱ्या-खोऱ्यांच्या असल्याने जंगल, बागायती व इमारत-घरांना वरचेवर आगी लावण्याचे प्रसंग घडत आहेत. जंगलांना किंवा बागायतींना आग लागण्याच्या प्रकारात वाढ झाली असून पोलिसांनी सूचना देताच अग्निशमक बंब घटनास्थळी धाव घेत असतात.
नगर परिषदांचे अग्निशमक दल खासगीकरणावर चालविले जात असून त्यासाठी मक्तेदार नेमला जातो. अग्निप्रलयासारख्या दुर्दैवी घटना वारंवार घडत असूनही शासनाने अग्निशामक दलाचे खासगीकरण केले आहे. त्यामुळे अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांच्या जीवितास धोका झाल्यास कोणत्याही पातळीवर भरपाई शक्य नाही. त्यामुळे या दलाचे कर्मचाऱ्यांच्या कामगिरीवर मर्यादा पडतात असे सांगण्यात आले.
जिल्ह्य़ातील चारही नगर परिषदांना शहर व नागरिकांच्या संरक्षणाची हमी घेऊन अग्निशामक दल तयार केलेले असते, पण नगर परिषद क्षेत्राबाहेर २० ते ३० किलोमीटर अंतरावर सध्या अग्निशमक बंब नेऊन आग विझविण्यास पुढाकार घेतला जातो.
शहराच्या क्षेत्राबाहेर दूरवर अग्निशामक बंब गेल्यावर शहरात एखादी दुर्दैवी घटना घडल्यास नागरिकांचा रोष नगर परिषद व कर्मचाऱ्यांना पत्करावा लागणारा आहे. शिवाय जनतेच्या नाराजीतून अप्रिय घटना घडण्याची भीतीही वाटते.
सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने अग्निप्रलयाच्या घटनांची नोंद घेऊन स्वतंत्र अग्निशामक व आपत्ती व्यवस्थापन दलाची निर्मिती करण्याची गरज आहे. अन्यथा अग्निप्रलयाच्या अप्रिय घटनांनी जीवित व वित्त हानी होण्याची भीती आहे.