सोलापूर : परमिट बारमध्ये क्षुल्लक कारणांवरून झालेल्या भांडणाचे पर्यवसान मेव्हणा आणि भावजी अशा दोघांच्या निर्घृण हत्यांमध्ये घडले. माळशिरस तालुक्यातील नातेपुतेजवळ फोंडशिरस येथे हा प्रकार घडला. याप्रकरणी आठजणांविरुद्ध नातेपुते पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून त्यापैकी कोणालाही अटक झाली नाही.

हेही वाचा – सांगली : रस्त्याअभावी पार्थिवाची झोळीतून वाहतूक

हेही वाचा – सांगलीचे खासदार कोण ? पैज समर्थकांच्या अंगलट

दुर्योधन नवनाथ निकम (वय २२) आणि त्याचे भावजी नारायण विठ्ठल जाधव (वय ४२, दोघे रा. दहिगाव, ता. माळशिरस) अशी हत्या झालेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी अक्षय ऊर्फ केवळ्या संजय बोडरे (वय २४, रा. फोंडशिरस) व त्याच्या भावजीसह इतर सहा आनोळखी तरुणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यासंदर्भात दोन्ही मृतांचा नातेवाईक राहुल नारायण बुधावले (वय १९, रा. दहिगाव) याने दिलेल्या फिर्यादीनुसार नातेपुते येथे एका परमिट बारमध्ये अक्षय बोडरे व त्याच्या मेव्हण्याने नारायण जाधव यांच्याशी क्षुल्लक कारणांवरून वाद घालून त्यांना मारहाण केली होती. त्यामुळे नंतर त्याचा जाब विचारण्यासाठी मृत नारायण जाधव व त्याचा मेव्हणा मृत दुर्योधन निकम यांच्यासह फिर्यादी राहुल बुधावले, बाळू कुंडलिक जाधव, विनोद पोपट गोरे असे पाचजण फोंडशिरसच्या दिशेने गेले. तेथील वनराईत महादेव मंदिराजवळ अक्षय बोडरे हा सापडला. तेव्हा अक्षय याने भ्रमणध्वनीद्वारे इतरांना संपर्क साधून, आपणास मारहाण होत असल्याचे सांगून तातडीने बोलावून घेतले. नंतर झालेल्या हल्ल्यात एका मुलाने अक्षय बोडरे यास चाकूसारखे तीक्ष्ण हत्यार दिले. त्या हत्याराने अक्षय बोडरे याने दुर्योधन निकम आणि नारायण जाधव या दोघांना भोसकले. छातीवर, बारगड्यांवर, काखेत गंभीर वार झाल्याने दोघेही रक्ताच्या थारोळ्यात कोसळले.