अतिसूक्ष्म बाबींचा विचार करून संगणकाद्वारे समस्येची उकल केली जातो, त्याच पद्धतीने समाजाच्या तळागाळातील लोकांच्या मूलभूत समस्यांचा अभ्यास करून ते सोडवण्यासाठी उपाययोजनांची मांडणी करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन समरसता गुरुकुलमचे संस्थापक गिरीश प्रभुणे यांनी केले.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, विवेकानंद संस्कार संस्था व पुणे येथील सेवावर्धिनी यांच्या वतीने राज्यातील सेवाक्षेत्रात कार्य करणाऱ्या विविध संस्थांच्या कार्यकर्त्यांचा अभ्यासवर्ग लातुरात आयोजित केला होता. यानिमित्त सेवाक्षेत्रातील सहभागाची संकल्पना या विषयावर प्रभुणे यांचे व्याख्यान झाले. डॉ. गोपीकिशन भराडिया, डॉ. राजेश पाटील व भूषण दाते यांची उपस्थिती होती. प्रभुणे म्हणाले, की तळागाळातील लोकांच्या समस्या अतिशय गुंतागुंतीच्या आहेत. या समस्यांचा उकल करणे हेही महाकठीण काम आहे. त्यामुळे सेवाक्षेत्रात काम करताना समस्यांचे मूलभूत चिंतन करूनच कामाची सुरुवात केली पाहिजे. भारतीय समाज अनेक जाती-जमातीत विखुरला गेला असला, तरी प्रत्येक जाती-जमाती कौशल्यावर आधारित कामामुळे रूढ झाल्या. हजारो वर्षांपासून त्या त्या जातीतील लोकांनी आपण सुरू केलेल्या कामात संशोधन करीत कौशल्य मिळविले. एका पिढीपासून दुसऱ्या पिढीत ते संक्रमितही होत असे. आजच्या शिक्षणपद्धतीत सरधोपटपणे सगळय़ांना एकाच सूत्रात बांधण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे शिक्षणानंतर बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे. शिकलेल्या मुलांची ‘ना घर का ना घाट का’ अशी अवस्था होते आहे. मुंबईतील जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये वारली चित्रकला हा स्वतंत्र विषय शिकविला जातो. पण हा विषय शिकविणारा प्राध्यापक वारली समाजाचा नाही व ते शिक्षण घेणारे विद्यार्थीही त्या समाजाचे नाहीत, याकडे प्रभुणे यांनी लक्ष वेधले.
मेकॉले शिक्षण पद्धतीच्या संकल्पनेने शिक्षणव्यवस्थेचे वाटोळे केले. शिक्षणाचा भारतीय संकल्पनेत विचार केला जात नाही, तोपर्यंत शिक्षणातून हवे ते साध्य होणार नसल्याचे ते म्हणाले. सेवाक्षेत्रात दरिद्रीनारायणाची सेवा अनेक लोक करीत आहेत, मात्र ज्यांच्यासाठी काम करायला ही मंडळी तयार आहेत, त्यांना नेमके काय हवे आहे? त्यांचे प्रश्न काय आहेत? हे समजून घेऊन काम केले नाही, तर केवळ सेवाक्षेत्रात काम केल्याचे समाधान मिळेल. त्यातून जो परिणाम साध्य व्हायला हवा, तो मात्र साधला जाणार नसल्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली. डॉ. राजेश पाटील यांनी प्रास्ताविक केले. डॉ. भराडिया यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. भूषण दाते यांनी आभार मानले.