अनुदानित सिलिंडरच्या चोरीची भीती मार्च महिन्याच्या अखेरीस निर्माण झाली आहे. जागृत ग्राहकांनी अशा प्रकारे त्यांच्या नावाने अनुदानित असलेल्या सिलिंडरची चोरी थांबविण्यासाठी वैयक्तिक प्रयत्न करण्याची गरज आहे. अशी चोरी थांबविण्यासाठी ग्राहकांनी त्यांच्या नावे घेतलेल्या सर्व सिलिंडर्सचा तपशील गॅस एजन्सीकडे मागावा. यात त्यांनी ज्या दिवशी सिलिंडर घेतलेले नाही, अशा त्यांच्या नावाने विकलेल्या सिलिंडरची माहिती मिळणार आहे. अशा न घेतलेल्या सिलिंडरची विक्री झाल्याचे लक्षात आल्यास संबंधित गॅस एजन्सी चालकांनी अनुदानित सिलिंडरची चोरी केल्याचे उघड होणार आहे.
केंद्र सरकारने नऊ अनुदानित  सिलिंडर्स आर्थिक वर्षांत देण्याची घोषणा केली आहे. ही घोषणा सप्टेंबर महिन्यात झाल्याने यंदा (आर्थिक वर्ष २०१२-२०१३) सप्टेंबर महिन्यापासून ते ३१ मार्चपर्यंत प्रत्येक ग्राहकाला अनुदानावर पाच  सिलिंडर्स देण्याचे केंद्राने जाहीर केले होते. त्यामुळे आता या कालावधीत पाच सिलिंडर्स न घेणाऱ्या ग्राहकांची संख्या मोठी आहे. असे अनुदानावर असलेले सिलिंडर्स परस्पर विकण्याचा गोरखधंदा काही गॅस एजन्सी चालकांनी सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली. तो थांबविण्यासाठी ग्राहक संघटनांची उदासीनता पाहता ग्राहकांनी त्यांच्या हक्काचे अनुदानित सिलिंडर डोळ्यादेखत चोरी होऊ नये, यासाठी काळजी घेण्याची गरज आहे. ज्या ग्राहकांनी सप्टेंबर महिन्यानंतर पाच सिलिंडर्स घेतले नसतील त्यांनी त्यांच्या नावाने किती  सिलिंडर्स उचलले गेले, याची माहिती गॅस एजन्सी चालकांना मागण्याची गरज आहे. विकत घेतलेल्या सिलिंडरपेक्षा अधिकचे सिलिंडर एजन्सी चालकाने परस्पर विकले असल्यास त्याचा खुलासा आता होणार आहे. पुढील आर्थिक वर्षांत अर्थात, सोमवार १ एप्रिलपासून ते पुढील ३१ मार्चपर्यंत सरकारी अनुदानावर एकूण नऊच सिलिंडर्स मिळणार आहेत. त्यामुळे त्याचे नियोजन गृहिणींना आतापासूनच करावे लागेल तरच पुढील वर्षी मार्चअखेपर्यंत गॅस सिलिंडर्स पुरतील. अनुदानित गॅस सिलिंडरची चोरी झाल्याचे ग्राहकांच्या लक्षात आल्यास संबंधित गॅस एजन्सीची तक्रार संबंधित पेट्रोलियम कंपनीच्या विपणन प्रतिनिधींकडे करण्याची गरज आता व्यक्त केली जात आहे. यासंबंधीची एक तक्रार संबंधित ग्राहकाने जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याकडे द्यावी. सरकारने ग्राहकांच्या नावाने दिलेल्या अनुदानित सिलिंडरची होणारी चोरी जागृतग्राहकांना थांबवावी लागणार आहे, अन्यथा सरकारी अनुदानाचा फायदा गॅस एजन्सी चालक मार्चअखेर स्वत:च्या पदरात पाडून घेण्याची भीती आता निर्माण झाली आहे.