शेतमालकासह दोघांना अटक

उमरेड-करांडला अभयारण्यातील ‘जय’ वाघाच्या बेपत्ता होण्याला एक वर्ष होत नाही तोच त्याचा बछडा ‘श्रीनिवास’ची शिकार झाल्याचे बुधवारी उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. नागभीड तालुक्यातील म्हसलीजवळील निलम-कोथुळणा शिवारात तृणभक्षी प्राण्यांपासून पीक वाचवण्यासाठी महादेव इरपाते या शेतकऱ्याने कुंपणात वीजप्रवाह सोडल्याने ‘श्रीनिवास’ अर्थात ‘टी-१०’ या वाघाचा मृत्यू झाला. या प्रकरणात शेतमालक महादेव इरपाते व सहकारी शुभम उईके यांना अटक करण्यात आली आहे.

‘जय’ला बेपत्ता होऊन १८ एप्रिलला एक वर्ष पूर्ण झाले. नेमके त्याचवेळी ‘श्रीनिवास’ या वाघाचीही रेडिओ कॉलरच्या माध्यमातून शेवटची नोंद झाली. तेव्हापासूनच त्याच्या बेपत्ता असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध होत होते. वनखात्याच्या गस्ती पथकाला म्हसली बिटात उघडलेली रेडिओ कॉलर मिळाली. एकीकडे ‘श्रीनिवास’चे बेपत्ता होणे आणि दुसरीकडे रेडिओ कॉलर मिळाल्याने वनखात्याने कॅमेरा ट्रप, गस्ती पथक आणि स्वयंसेवींच्या माध्यमातून शोधमोहीम सुरू केली. याच ठिकाणी महादेव इरपाते यांचे शेत असून त्याच्या संशयास्पद हालचालीवरून वन खात्याचा संशय बळावला.

गुरुवारी सकाळी महादेव इरपाते यांचा मुलगा उत्तम इरपाते याला चौकशीसाठी बोलावले. त्याने या संदर्भात आपणास काहीच माहिती नसून वडिलांना माहिती असावी असे सांगितले. त्यामुळे महादेव इरपाते यांना चौकशीसाठी बोलावले असता त्यांनी लगेच गुन्ह्याची कबुली दिली. यानंतर लगेच घटनास्थळ गाठून खोदकाम केले असता वाघाचे शव मिळाले.

पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे यांनी वाघाचे शवविच्छेदन केले. त्यानंतर त्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी ब्रम्हपुरीचे उपवनसंरक्षक उलरामसिंह, सहाय्यक उपवनसंरक्षक पंधरे, उमरेड-करांडलाचे सहाय्यक वनसंरक्षक बोबडे, पवनीचे वनपरिक्षेत्र अधिकारी बारई, भारतीय वन्यजीव संरक्षण संस्थेचे नितीन देसाई तसेच वनखात्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. वाघाचा विसेरा आणि इतर घटक न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत.

उमरेड-करांडला अभयारण्य आणि ताडोबा अभयारण्याच्या भ्रमणमार्गात ही घटना घडली. निलम-कोथुळणाच्या शेतशिवारापासून दोन किलोमीटरवर नाला आहे आणि तिथेच महादेव इरपाते यांचे शेत आहे. या संपूर्ण परिसरात भरपूर पाणी आहे. त्यामुळे उन्हाळयातसुद्धा येथे धान लावले जाते. एप्रिल महिन्यातील उन्हाळी धानावर रानडुकरांचा धुमाकूळ असल्याने शेतकरी शेताच्या कुंपणावर वीजप्रवाह सोडतात. महादेव इरपाते यांनीही तेच केले. १९ एप्रिलला ‘श्रीनिवास’ हा वाघ त्यात अडकला आणि मरण पावला. २० एप्रिलला सकाळी ही घटना उघडकीस येताच ते घाबरले. मृत वाघाच्या गळयातील रेडिओ कॉलर त्यांनी उघडली आणि शेतशिवारापासून दोन किलोमीटरवर असलेल्या नाल्यात फेकून दिली. मुलाचे सासरे शुभम उईके यांच्या मदतीने वाघाचा मृतदेह जमिनीत पुरला.