भुशी धरण परिसरात पर्यटनासाठी आलेल्या अंधेरी येथील दोन तरूणांचा धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. दहा दिवसांमधील तरूण बुडाल्याची ही चौथी घटना आहे. या ठिकाणच्या सुरक्षिततेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष कायम आहे.
भूपेन धीरज भंडारी (वय २०, मालपा डोंगरी क्रमांक तीन, अंधेरीपूर्व) आणि अनिकेत शहाजी हांडे (वय २०, रा. जिजामाता मंदिर, अंधेरी पूर्व, मुंबई) अशी मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भुपेन, अनिकेत आणि त्यांचे एकूण १३ मित्र हे लोणावळा परिसरात पर्यटनासाठी आले होते. भुशी धरणाजवळ आल्यानंतर पोहता येत नसताना देखील भूपेन व अनिकेत हे पाण्यात उतरले. त्यांना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ते पाण्यात बुडाले. धरण परिसरातील जीवरक्षक साहेबराव चव्हाण आणि राजू पवार यांनी या दोघांचे मृतदेह बाहेर काढले. गेल्या आठवडय़ात तरूण बुडाल्याची ही चौथी घटना आहे. लोणावळा परिसरात आठ दिवसात पाच तरूणांचा मृत्यू झाला असून त्यापैकी चार जण हे भुशी धरणात बुडाले आहेत. पोलिसांनी लावलेल्या सूचना फलकांकडे दुर्लक्ष करत युवा पर्यटक उत्साहाच्या भरात पाण्यात उतरून मृत्यूला अमंत्रण देत आहेत. या दोघांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचे मृतदेह धरणातून बाहेर काढत असताना देखील काही अतिउत्साही तरूण धरणात उडय़ा मारत होते. या धरण परिसरात शासनाने अधिकृतरीत्या अद्याप एकही जीवरक्षक नेमलेला नाही. शनिवार आणि रविवारी या ठिकाणी हजारो पर्यटक येतात. त्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे.