लोणावळा : लोणावळा, खंडाळा तसेच रायगड जिल्ह्यातील खोपोली, खालापूर, पनवेल भागात मुसळधार पाऊस सुरू असल्याने मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग तसेच राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुसळधार पाऊस आणि धुक्यामुळे घाटक्षेत्रातील दृश्यमानता कमी झाली आहे.

मुसळधार पावसामुळे डोंगर कपारीतील दगड निसटण्याची शक्यता आहे. घाट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर धुके असल्याने दृश्यमानता कमी झाली आहे. लोणावळा-खंडाळा घाट क्षेत्रात गेल्या तीन दिवसांपासनू मुसळधार पाऊस सुरू आहे. पनवेल ते शेडुंग दरम्यानचा मार्ग मुसळधार पावसामुळे दोन वेळा पाण्याखाली गेला होता. वाहतुकीचा वेग संथ झाला आहे. खालापूर ते खंडाळा घाट क्षेत्रात वाहनचालकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, घाट क्षेत्रात महामार्ग पोलिसांकडून अतिरिक्त बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या भागात दुर्घटना घडल्यास त्वरित मदत करण्यासाठी यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आली आहे.