नाशिकमध्ये शनिवारी वकीलवाडी या मध्यवर्ती भागात भलेमोठे झाड रस्त्यावर कोसळल्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेत तीनजण जखमी झाले आहेत. हे झाड अचानकपणे रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांवर कोसळले.  यापैकी एका दुचाकीस्वाराचा पाय झाडाखाली तब्बल एक तासभर अडकून होता. झाड पडले तेव्हा हा युवक दुचाकीवर बसला होता. झाड पडत असताना त्याने बाजुला होण्याचा प्रयत्न केला. मात्र, झाडाचा बुंधा त्याच्या पायावर कोसळला आणि तो अडकून पडला. स्थानिकांनी युवकाला झाडाखालून काढण्याचा प्रयत्न केला, पण झाड मोठे असल्याने अपयश येत होते. अखेर अग्निशमन दल आणि महापालिका कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नानंतर युवकाला तब्बल तासाभरानंतर सुखरुपणे बाहेर काढण्यात आले. दरम्यान, यावेळी  बघ्यांच्या आणि अतिउत्साही गर्दीमुळे बचावकार्यात अडथळे येत होते. झाडाखाली पाय अडकल्यामुळे हा तरूण वेदनेने कळवळत होता. मात्र, काही अतिउत्साही लोक या प्रसंगाची छायाचित्र आणि सेल्फी काढण्यात मग्न होतेे.
वकीलवाडी हा नाशिकमधील अतिशय वर्दळीचा परिसर आहे. या रस्त्यावर जुनी झाडेही मोठ्या प्रमाणात आहेत. पावसाने झाडे कमकुवत झाल्याने अशा दुर्घटना घडत आहेत. या दुर्घटनेत दुचाकीस्वाराला मोठी जखम झाली आहे.